उद्योजक हरीश काळे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा

 

* वाढदिवसानिमित्त दोन शाळेमधील ३१५ विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचे वाटप 

कर्जत / नरेश जाधव :- खोपोली शिळफाटा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक हरीश काळे हे सामाजिक कार्यात नेहमी सहभाग घेत असून अनेक शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, उत्सव यांसह आदी कार्यक्रमात त्यांचा खारीचा वाटा असतो म्हणून ते खोपोली शहरात नेहमी सर्वसामान्य व जनमानसांत चर्चेत असतात. दरवर्षी हरीश काळे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात असतो. पण ह्या वर्षी हा वाढदिवस साध्या प्रमाणात साजरा करण्यात आला.

याबाबत हरीश काळे म्हणाले की, दि. २७ जून रोजी दरवर्षी प्रमाणे माझा जन्मदिवस असतो. पण, काही दिवसांपूर्वी माझे जवळचे सहकारी मित्र माजी नगरसेवक कै. अमोल तुकाराम जाधव, कै. हरेश चव्हाण, कै. पप्पु (संतोष) जाधव, कामगार नेते कै. दिलीप सोनवणे यांसह इतर काही व अनेकांच्या अचानक निघून जाण्याने माझे मन सुन्न झाले आहे. माझ्या आयुष्यातील कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. तरी या वर्षी मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला प्रत्यक्ष न भेटता, शुभेच्छा बॅनर यांसह फुलांचे बुके देऊन शुभेच्छा न द्यावेत. आपले शुभ आशिर्वाद मला द्यावेत व आपला स्नेह, शुभेच्छांसह सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन केले होते. तरी देखील माझ्यावर प्रेम करणार्‍यांनी अनेक स्तरातून व माध्यमातून कळत नकळत शुभेच्छा संदेश देत वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचाच आभारी आहे.

काळे पुढे म्हणाले की, माझ्या सामाजिक कार्यात खंड पडू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे मी शिळफाटा परिसरातील काही शाळांना वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप करीत असतो म्हणून यंदा देखील वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला आहे. शिळफाटा हद्दीत येणाऱ्या महात्मा गांधी शाळा क्र. ११ तसेच डॉं. जाकीर हुसेन शाळा क्र. १५ या दोन्ही शाळेत हरीश काळे यांचे चिरंजीव सार्थक काळे व कंपनीचे कर्मचारी यांच्या हस्ते सुमारे ३१५  विद्यार्थांना वह्या आणि पेन वाटप करण्यात आले. यावेळी मराठी शाळा व उर्दु शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग हे उपस्थित होते.

हरीश काळे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या. तसेच कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर तसेच माजी नगरसेवक व माजी नगरसेविका यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीकडून  वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post