* दंड करून गुरे जाणार गोशाळेत अन् मालकांवरही होणार कायदेशीर कारवाई
चोपडा / महेश शिरसाठ :- सध्या चोपडा शहरात रहदारीच्या रस्त्यांवर व रहिवासी परिसरात मोकाट जनावरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढला असून काही नागरिकांनी त्यांच्या मालकीची गुरे, गायी, म्हशी, बकऱ्या, डुकरे आदी प्रकारची जनावरे गावात मोकाट सोडून दिलेली आहेत. तर मोकाट जनावरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरांमुळे वाहन चालक, नागरिकांना रस्त्याने ये-जा करण्यास अडचणी होत असुन मोकाट जनावरांमुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.
त्या अनुषंगाने चोपडा नगरपरिषदेमार्फत न. पा. कर्मचारी यांच्याकडून दि. ४ जुलै २०२४ पासून शहरात मोकाट फिरणारे गुरे, जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकण्याची कार्रवाई सुरु आहे. तसेच त्यांच्या मालकांकडून दंड वसुल करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरु आहे. तरी नागरिकांनी त्यांच्या मालकीचे जनावरे मोकाट न सोडता आपआपल्या गोठ्यात किंवा गावाबाहेर बांधून ठेवावी अन्यथा नगरपरिषदेमार्फत मोकाट जनावरे पकडून गो शाळेत पाठविण्यात येतील व जनावरे मालकांवर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी शहरातील नागरीकांना सुचित केले आहे.
