बुमराहचे षटक अन् सूर्यकुमारचा अफलातून झेल



* 17 वर्षानंतर टीम इंडियाचे स्वप्न पूर्ण

*आफ्रिकेला पराभूत करीत विजेतेपद 

मुंबई :- भारतीय संघाने टी-20विश्वचषक स्पर्धेतील 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपविला. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-20 2024 विश्वचषकाचा चॅम्पियन ठरला. 2013 नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. रोमांचक लढतीत भारताने हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगने दमदार गोलंदाजी करुन विजय खेचून आणला. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 30 धावा करायच्या होत्या. पण, भारताच्या आक्रमक गोलंदाजीमुळे आफ्रिकेचे प्रयत्न अपुरे पडले. जसप्रीत बुमराह प्लेअर ऑफ द टूर्नामेट ठरला. भारताने आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करताच सर्व खेळाडूंनी जल्लोष केला.

अंतिम सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पण नंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी शानदार फलंदाजी करीत दक्षिण आफ्रिकेला जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर आणले. यानंतर हार्दिक पांड्याने हेन्रिक क्लासेनची अत्यंत आवश्यक विकेट घेतली. पण सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला तो डेव्हिड मिलरचा झेल जो सूर्यकुमार यादवने अप्रतिमपणे झेलला.

बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकण्यापूर्वी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या शानदार 76 धावा आणि अक्षर पटेलच्या शानदार 47 धावांच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 176 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. यानंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी शानदार फलंदाजी करत टीम इंडियाकडून सामना जवळपास हिसकावून घेतला होता. हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करीत हेनरिक क्लासेनला झेलबाद केले. पण डेव्हिड मिलर अजूनही क्रीजवर उपस्थित होता. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. डेव्हिड मिलर स्ट्राइकवर होता. यावेळी डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न केला. जवळपास मिलर यशस्वी देखील झाला. मात्र सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर धावत येऊन चेंडू पकडला. पण तो सीमारेषेला स्पर्श करणार होता. त्यामुळे त्याने चेंडू हवेत फेकला आणि नंतर सीमारेषेत प्रवेश केला आणि हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. जर त्याला झेलऐवजी षटकार मिळाला असता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकू शकला असता आणि टीम इंडियाचे विजेतेपदाचे स्वप्न भंग झाले असते.

* विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब 

संपूर्ण विश्वचषकात अनुभवी विराट कोहलीची बॅट शांत राहिली. पण जिथे गरज होती तिथे विराट कोहलीने शानदार खेळी करत टीम इंडियाला अशा एकूण धावसंख्येवर नेलं की जिथे टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सामना जिंकला आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. विराट कोहलीच्या 76 धावांच्या शानदार खेळीमुळे विराट कोहलीला सामनावीराचा किताबही देण्यात आला.

* रोहित शर्माने मातीचे कण तोंडात घातले :-

सामन्यातील शेवटचा चेंडू पडताच रोहित शर्मा मैदानावर झोपला आणि जोरजोरात हात आपटून रडू लागला. रोहित शर्मासह सर्वंच खेळाडूंना आनंदाश्रू अनावर झाले. यावेळी रोहित शर्माने अंतिम सामना ज्या खेळपट्टीवर खेळवला गेला, त्या बार्बाडोसच्या खेळपट्टीवर बसून मातीचे कण तोंडात घातले आणि वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक झाला. आयसीसीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहताच सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळत आहे. 

* पीएम मोदींनी व्हिडिओ संदेशाद्वारे टीम इंडियाचे केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशात टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, संपूर्ण देशाच्यावतीने या शानदार विजयासाठी टीम इंडियाचे खूप खूप अभिनंदन. ते म्हणाले की, आज 140 कोटी देशवासीयांना तुमच्या उत्कृष्ट कामगिरीचा अभिमान वाटत आहे. तुम्ही क्रीडा क्षेत्रात विश्वचषक जिंकलात पण भारतातील प्रत्येक गावात, गल्लीत आणि परिसरात तुम्ही लाखो देशवासीयांची मने जिंकलीत. ही स्पर्धाही एका खास कारणासाठी लक्षात राहील. इतके देश आणि अनेक संघ आणि एकही सामना न गमावणे ही छोटी कामगिरी नाही.

* विराट, रोहित, जडेजाची निवृत्ती :- 

एकीकडे टी-20 विश्वचषकाच्या विजयामुळे भारतीय आनंदात न्हाऊन निघाले आहेत. पण या स्पर्धेच्या विजयानंतर टीम इंडियाच्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या शिलेदारांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताने तब्बल 17 वर्षानंतर जेतेपद पटकावल्यामुळे एकीकडे क्रिकेटप्रेमी आनंद व्यक्त करीत आहेत. पण विराट, रोहितच्या या निर्णयामुळे तेवढीच नाराजी व्यक्त केली जात आहे. यासोबतच रवींद्र जडेजा याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट लिहून त्याने आपला हा निर्णय सार्वजनिक केला आहे. रवींद्र जडेजा असा काही निर्णय घेईल, याची कल्पना कोणालाही नव्हती. पण विश्वचषक हाती आल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post