कर्जत (जि. रायगड) / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री माझी स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत कर्जत महिला मंडळ विद्या मंदिर शाळेचा तालुक्यातून दुसरा क्रमांक आला असून 2,00,000/- रुपये (दोन लाख रुपये) रोख असे पुरस्कार मिळाले आहे. या उपक्रमांतर्गत 45 दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये विद्यार्थी केंद्रीत उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये कर्जत तालुक्यातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या.
प्रथम ऑनलाईन शाळेची नोंदणी करून शाळेबद्दलची माहिती, शाळेतील उपक्रमांचे फोटो व उपक्रमांचे अहवाल ऑनलाईन अपलोड केल्यानंतर प्रत्यक्ष शाळा तपासणी केंद्र प्रमुख यांच्या पथकाकडून करण्यात आली. ऑनलाईन व ऑफलाईन माहितीची तपासणी करण्यासाठी केंद्र प्रमुखांचे एक पथक शाळेत तपासणीसाठी आले होते, त्यांनी प्रत्यक्ष सर्व बाबी तपासून पाहिल्या. विद्यार्थ्यांना आवश्यक ते प्रश्न विचारले. सर्व उपक्रम उत्तम प्रकारे केले असल्यामुळे शाळा केंद्र स्तरावरून तालुका स्तरावर निवडली गेली. त्यानंतर पुन्हा तालुका स्तरावरील पथक शाळा तपासणीसाठी आले होते, त्यांनी अत्यंत सूक्ष्मपणे शाळेची तपासणी केली आणि शाळेतील मंत्रिमंडळ काय काम करते? शाळेत बचत व्यवस्था कशी आहे? कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर कर्जत शाळेची तालुक्यात मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा या उपक्रमात दुसऱ्या नंबरसाठी निवड करण्यात आली.
शासनाचा मानाचा असा दुसरा क्रमांक प्राप्त झाला. यासाठी शाळेतील कार्याध्यक्षा मीनाताई प्रभावळकर आणि मुख्याध्यापिका स्नेहा गाढे यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षिका श्रद्धा मुंढेकर, मेघा पिगळे, प्रेमा पितळे, आरती कोकरे, माधुरी देशमुख, वृशाली माळी, शारदा राठोड, सुप्रिया भासे, स्मिता गणवे, सुमिता अहिरराव, वर्षा पवार, रिंकू शर्मा, निलम बडेकर, अर्चना भुसाळ, सारिका देशमुख, प्रियंका पालवे, सेविका सुनंदा गायकवाड, संगीता पांडे, रजनी चंद्रमोरे यांनी उकृष्ट कामगिरी करून व उपक्रमांच्या फाईलची रचना उत्तम प्रकारे करून शाळेला दुसरा क्रमांक मिळवून दिला. त्याबद्दल शाळेचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. यासाठी मुख्याध्यापिका स्नेहा गाढे यांनी या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या संस्थेतील सर्व पदाधिकारी सर्व सदस्या, शाळेतील सर्व पालक आणि विद्यार्थी यांचे आभार व्यक्त केले. या कामगिरीसाठी शाळेवर सर्वच स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.