* अभियंते गायब, PQC मध्ये मोठा घोटाळा
* वंचित बहुजन आघाडीच्या सोहनी यांचा आरोप
मुंबई / नितीन पाटणकर :- मुलुंड आग्रा रोड परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्यांचा बेजबाबदारपणा आणि ठेकेदारांची मनमानी उघड झाली आहे. खुद्द आयुक्त भूषण गगराणी व अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या स्पष्ट सूचनांनंतरही, नियमानुसार कामाच्या वेळेस महापालिकेचे अभियंते उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. या कामाची पाहणी करताना वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी या गंभीर अनियमिततेकडे लक्ष वेधले.
* सर्व नियम धाब्यावर ; ठेकेदाराच्या अधिपत्याखाली चाललेले काम :-
महापालिकेच्या नियमानुसार, रस्त्याच्या बांधकामात RMC (Ready Mix Concrete) आणि PQC (Pavement Quality Concrete) प्रक्रियेदरम्यान संबंधित अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. मात्र, प्रत्यक्षात या नियमांचे पालनच होत नसल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण काम ठेकेदाराच्या सुपरवायझरच्या देखरेखीखाली सुरु असून, महापालिकेचा एकही अभियंता तिथे नव्हता.
* PQC मध्ये थेट ५०% कपात – निधीच्या वापरावर गंभीर प्रश्नचिन्ह :-
कामाची तपासणी करतांना स्पष्ट झाले की, रस्त्याच्या PQC थराची जाडी किमान २०० मिमी असणे आवश्यक असताना, केवळ १०० मिमीची PQC घालण्यात आली आहे. यामुळे रस्त्याच्या टिकाऊपणावर आणि गुणवत्ता नियंत्रणावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. हे काम कागदोपत्री काही आणि प्रत्यक्षात काही वेगळेच सुरू असल्याचे निदर्शनास आले.
* ३३ कोटींच्या IIT समितीचे मौन संशयास्पद :-
महापालिकेने रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी IITच्या तज्ज्ञांमार्फत एक समिती स्थापन केली होती, आणि या समितीसाठी तब्बल ३३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, सद्यस्थिती पाहता ही समिती फक्त कागदावरच सक्रिय असून, प्रत्यक्षात तिचा काहीच परिणाम होत नसल्याचे स्पष्ट होते. या प्रकारावरून ही समिती देखील झोपलेली आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
* अतिरिक्त आयुक्तांचे ‘दिशा दाखवणे’ केवळ फोटोपुरते ? :-
अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर हे विविध ठिकाणी कामाची पाहणी करीत असल्याचे फोटो प्रसारमाध्यमांमध्ये झळकतात, मात्र त्याचा प्रत्यक्ष कामांवर काहीच परिणाम होताना दिसत नाही. कामाचा दर्जा घसरलेला असून कर्मचारी जबाबदारी झटकत आहेत. नागरिकांची फसवणूक होणे आणि निधी वाया जाणे, हेच वास्तव आहे.
* स्नेहल सोहनी यांची उपरोधिक टीका – अभियंत्यांना झोपेसाठी रजा द्या :-
या सगळ्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे स्नेहल सोहनी यांनी महापालिकेवर जोरदार टीका केली. "जर संबंधित अभियंते कामाच्या वेळेस अनुपस्थित राहत असतील आणि झोपा काढत असतील, तर त्यांना झोप पूर्ण करण्यासाठी रजा द्यावी," अशी उपरोधिक मागणी करीत त्यांनी प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रहार केला.
* तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा :-
या घोटाळ्याची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण मुंबईत आंदोलन उभे केले जाईल, असा स्पष्ट इशाराही स्नेहल सोहनी यांनी दिला आहे. जनतेचा पैसा वाया जाणार नाही, याची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.