* होळीचा आनंद द्विगुणित
खालापूर / प्रतिनिधी :- अश्वपरीस फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा इशिका शेलार व पदाधिकारी नेहमीच सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असताना अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. तसेच लैंगिक शिक्षण व सायबर क्राईमचे धडे तसेच आदिवासी समुपदेशन, समाज जागृतीमध्ये समाजाचे ऋण मानून कार्यरत राहतांना समाजातील विविध घटकांना मदत करणे तसेच भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्याचा मानस असून 'आपण समाजाचे देणं लागतो' ह्या शिकवणीने प्रथमच अश्वपरीस फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक बाळगोपाळांना होळी सणानिमित्त वासरंग, शेडवली विटभट्टी, महड विटभट्टी, झेनिथ कॉर्नर, झेनिथ आदिवासी वस्ती आदी ठिकाणी पुरणपोळीचे वाटप करण्यात आले.
या मंगलदिनी अश्वपरीस फाऊंडेशनतर्फे एक विशेष उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच विटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षण देत असताना त्यांना पुन्हा एकदा होळीच्या निमित्ताने भेटण्याचा विशेष योग जुळून आला, ह्या नियोजनामुळे बच्चे कंपनी अगदी भारावून गेली. विशेष करून हा उपक्रम कुर्ला येथे सुद्धा नायकवडी परिवाराकडून राबवून साजरा करण्यात आला. ह्यात सहकार्य करणाऱ्या पदाधिकारी व अनेकांनी विशेष मदतीचा हात दिला, त्यामुळे पुरणपोळीचा गोडवा द्विगुणित झाला.
समजोपयोगी असे उपक्रम राबवून तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची मनःशा जानव्ही नायकवडी यांनी अश्वपरीस फाऊंडेशनला व्यक्त करून दाखवली. होळीच्या पावन ज्वाळांमध्ये दुःख, दारिद्र्य आणि निराशेचे दहन होवो आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांततेचा प्रकाश फैलावा अशी आशा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. अनेकांचा सहभाग या पुण्यकार्यात अमूल्य ठरला. लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद हे अजून सामाजिक कार्य करण्यासाठी बळ देऊन जाते. या उपक्रमास बच्चे कंपनी तसेच त्यांचे पालक वर्ग, संस्थेचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र स्थरांतून कौतुक होत आहे.