* नारंगीच्या उपसरपंचासह एचपी कंपनीच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल
खालापूर / सुधीर देशमुख :- खालापूर तालुक्यातील नारंगी येथील पंचशीलनगर बौद्धविहारात उपसरपंच देवेंद्र बळीराम देशमुख व एचपी (HP) कंपनीच्या एका व्यक्तीने पायात चप्पल-बूट घालून प्रवेश करून बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखाविल्या, असा गंभीर प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, जातीय मानसिकतेतून हा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.
ही घटना ४ मार्च २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता घडली. चेतन नंदकुमार गायकवाड यांनी दिलेल्या जबाबानुसार, ते घरी परतल्यावर त्यांना उपसरपंच देवेंद्र देशमुख व एचपी कंपनीचा एक इसम बौद्धविहारात खिडक्यांचे मोजमाप घेताना दिसले. मात्र, त्यांनी पायात चप्पल आणि बूट घालूनच पवित्रस्थळी प्रवेश केला होता. जेव्हा चेतन गायकवाड यांनी एचपी कंपनीच्या व्यक्तीला याबाबत विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, देशमुख साहेबांनी सांगितले म्हणून मी बूट घालून आलो. यावर गायकवाड यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, आम्ही बौद्ध विहाराच्या गाभाऱ्यात कुठे गेलो आहे ? असे उद्धटपणे वागत उपसरपंच देवेंद्र देशमुख यांनी धमकी दिली असल्याचे चेतन गायकवाड यांनी जबाबात म्हटले आहे.
या प्रकारामुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखाविल्या असून, जातीय मानसिकतेतून जाणूनबुजून हे अपवित्र कृत्य केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे खालापूर पोलिस ठाण्यात उपसरपंच देवेंद्र देशमुख आणि एचपी कंपनीच्या इसमाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS 2023) व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी नारंगी पंचशील नगरचे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य निनाद गायकवाड, स्वप्निल गायकवाड, सनी गायकवाड, आशिष गायकवाड, आकाश गायकवाड, राहुल गायकवाड, प्रज्वल गायकवाड, पोलिस पाटील आदी नारंगी पंचशीलनगरचे ग्रामस्थ उपस्थित होते.
या प्रकरणानंतरही देवेंद्र देशमुख यांनी कोणतीही माफी मागितलेली नाही, त्यामुळे बौद्ध समाजात संतापाची लाट उसळली आहे. ही जातीय मानसिकतेतून केलेली उद्दाम कृती असून, आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी समाजातून होत असून या घटनेचा अधिक तपास खालापूरचे पोलिस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम हे करीत आहेत. ही घटना नुसती चूकच नव्हे, तर एका विशिष्ट समाजाच्या श्रद्धास्थानाचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप होत असून या प्रकरणात दोषींवर त्वरित कारवाई केली जाईल का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. या गंभीर प्रकरणावर पोलिस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
