* सोमय्या विद्याविहार विद्यापीठाने पं. सदाशिव त्र्यंबक रहातेकर यांच्या कार्याची घेतली दखल
कर्जत / विलास श्रीखंडे :- केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली शिक्षा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत अष्टादशी या विशेष योजनांद्वारे संस्कृत भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी दिलेल्या अनुदानानुसार सोमय्या विद्याविहार विद्यापीठाने संस्कृत भाषेतील बालगीतशतकम् या ग्रंथाच्या निर्मितीचे कार्य हाती घेतले आहे. या ग्रंथात रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील सुप्रसिद्ध संस्कृतचे विद्वान पंडित सदाशिव त्रंबक राहतेकर यांच्या संस्कृत साहित्यातील १४ कवितांचा समावेश करण्यात आला असल्याचे सोमय्या विद्यापीठाकडून त्यांना नुकताच कळविण्यात आले आहे. त्यामुळे संस्कृत पंडित सदाशिव त्रंबक राहतेकर यांच्या संस्कृत साहित्याची निवड झाली असल्यामुळे ही बाब निश्चितच कर्जतकरांसह संपूर्ण रायगड आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे असे बोलले जात आहे.
संस्कृतचे विद्वान पंडित सदाशिव त्र्यंबक रहातेकर यांचा अल्पपरिचय द्यायचा झाला. तर, यांचा जन्म २१ ऑगस्ट १९३३ रोजी कडाव या ठिकाणी झाला. ते १९५२ मध्ये मॅट्रिक उत्तीर्ण झाले. तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथील प्रथम आणि द्वितीय परीक्षा संस्कृतमधून उत्तीर्ण झाले. १९९१ साली रेल्वेतून चिप यार्ड मास्टर या पदावरून निवृत्ती झाले. निवृत्तीनंतर काही वर्ष ज्येष्ठ नागरिक संघ, वनवासी कल्याण आश्रम, कोकण मराठी साहित्य परिषद, रेल्वे निवृत्ती कर्मचारी संघ आदी संस्थांमधून कार्य करीत असताना आवडत्या संस्कृत विषयाचा पंडित काळे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला. १९९७ पासून आजपर्यंत संस्कृत गद्य लेखन व वृत्तबद्ध काव्यरचनेचा व्यासंग त्यांना व्यासंग आहे.
त्यांच्या या विशेष कार्याची दखल घेत १९९९ मध्ये कै. शाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार त्यांना पुणे येथे प्रदान करण्यात आला. तर राज्य सरकारने मानद संस्कृत सल्लागार पं. श्री. धू. कवीश्वर यांच्याकडून कल्याण येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. २०१६ मध्ये सनातन धर्मसभा अहमदनगर यांच्याकडून पू. जगद्गुरु शंकराचार्य करवीरपीठ यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आल. अशाप्रकारे त्यांच्या कामाची सर्व स्तरांतून दखल घेत त्यांना तालुका आणि जिल्हास्तरावर सुद्धा विविध संस्था आणि संघटनांकडूनही सन्मानित करण्यात आला आहे.
सध्या कर्जतमध्ये वास्तव्यास असणारे संस्कृत पं. सदाशिव त्रंबक राहतेकर यांचा संस्कृत विषयातील अभ्यास लक्षात घेता त्यांच्या संस्कृत साहित्यातील १४ कवितांचा बालगीतशतकम् या ग्रंथाच्या निर्मितीत समाविष्ट करण्यात येणार असल्याचे त्यांना १३ मार्च २०२५ रोजी सोमय्या विद्याविहार विद्यापीठाकडून कळविण्यात आले. त्यामुळे पं. सदाशिव त्रंबक राहतेकर यांनी आपल्या कार्याची दखल घेतल्यामुळे त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे.
