मुंबई / प्रतिनिधी :- पर्यटन व्यवसायात महिला व्यावसायिकांची संख्या आजही अत्यल्प असून, त्यांच्या अंगी असलेल्या अगत्य, आतिथ्य आणि एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याच्या कौशल्यामुळे त्यांना या व्यवसायात मोठी संधी आहे, त्यामुळे महिलांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन न्यूज स्टोरी टुडे च्या निर्मात्या अलका भुजबळ यांनी केले. अर्थसंकेत 'महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड' पर्यटन विशेष कार्यक्रम नुकताच मुंबईतील कोहिनुर बिझनेस स्कुलमध्ये मोठ्या उत्साहात झाला, त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
भुजबळ पुढे म्हणाल्या, पर्यटन क्षेत्रातील कौटुंबिक परंपरा असलेल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला आज पर्यटन क्षेत्रात दिसून येतात. पण
पर्यटन क्षेत्राशी निगडीत अशा प्रवास व्यवस्था, निवास व्यवस्था, वाहन व्यवस्था, पर्यटन मार्गदर्शक अशा अनेक प्रकारच्या बाबी महिला सक्षमपणे हाताळू शकतील अशा आहेत. त्यात पर्यटन व्यवसायाची व्याप्ती ही संपूर्ण जगभरासाठी आहे. त्यामुळे महिलांनी या क्षेत्रात पुढे आले पाहिजे. महिलांचे या व्यवसायातील महिलांचे प्रमाण वाढण्यासाठी त्यांच्यासाठी पुस्तकार सुरू करण्यात यावे, अशी सूचना ही त्यांनी केली.
दुसरे प्रमुख पाहुणे ग्लोबल अँजेलो ग्रुपचे प्रमुख अग्नेलो राजेश अथयाडे यांनी संपूर्ण जगाचे प्रतिबिंब भारतात आहे. त्यामुळे पर्यटनाद्वारे कोणत्याही राज्याला सातत्यपूर्ण उत्पन्न मिळते असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना डॉं. अविनाश फडके म्हणाले की, मराठी माणूस उत्तमरीत्या व्यवसाय करू शकतो. त्याने आपला उद्योग लघु व मध्यम स्तरातील असला तरी त्याची शेअर बाजारात नोंदणी करून त्याद्वारे भांडवल उभे करून व्यवसाय मोठे केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.
मराठी माणसाने मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायात पुढे येण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षकरांच्या नियमांचे अनुपालन करायला मराठी उद्योजक कमी पडताना दिसतात, असे विचार वस्तू व सेवा कर उपायुक्त चैतन्य ताथारे यांनी मांडले.
कोहिनुर बिझनेस स्कुलच्या संचालिका डॉं. स्वेतलाना तातूस्कर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कोहिनुरच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
'महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड' संकल्पनेमध्ये सहभागी ब्रँडचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सात दिवस व्होटिंग घेतले जाते. व्होटिंगनंतर जास्त व्होट मिळालेल्या विभागास पुरस्कार दिला जातो, असे अर्थसंकेतचे संस्थापक डॉं. अमित बागवे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील हजारों पर्यटन संस्थांपैकी फक्त नऊ संस्था बनू शकल्या 'महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड'. ट्युलिप हॉलिडेज, खवणे कयाक्स, दीपक वर्ल्ड व्हेकेशन्स ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’ ठरले. बेसिल लीफ हॉलिडेज, जोगळेकर कॉटेज, शिवांजली हॉलिडे होम, राजगुरू टूर्स बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड ठरले. ईशा टूर्स आणि फ्लाईंग कोकण मोस्ट इन्नोव्हेटिव्ह ब्रँड ठरले. 'आयकॉनिक टुरिझम ब्रँड ऑफ महाराष्ट्र' या पुरस्काराने 'वेदभुमी इको व्हिलेज'चा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार नार्वेकर यांनी केले. रचना आर्टस् अँड क्रिएशन्सच्या संस्थापिका रचना लचके बागवे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला पर्यटन व्यवसायातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
