नातेपुते / प्रतिनिधी :- शिक्षण आणि कला यांचा सुरेख मेळ घालत माळशिरस तालुक्यातील जि. प. प्रा. शाळा शिंदे वस्ती नं. 2 येथे लहान मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शिंदेवाडी केंद्राचे केंद्र प्रमुख सिद्धेश्वर भरते, डॉं. जे. जे. चोपडे (एम.एस.), दशरथ शिंदे, शिंदेवाडी सरपंच शारदा शिंदे, देशमुखवाडी पोलिस पाटील डॉं. विनोद देशमुख, शिंदेवाडी केंद्रातील सर्व शिक्षकवृंद यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
या शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कला व नृत्य सादर करीत प्रत्येक गाण्यांवर वेगळी वेषभूषा परिधान करून आपले नृत्य सादर केले. अप्रतिम कला सादर करून मुलांनी नृत्य व अभिनयाची अतिशय सुरेख कला दाखवून प्रमुख पाहुणे तसेच माता-पालकांची मने जिंकली. लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून माता-पालकांनी टाळ्या वाजवत त्यांना प्रोत्साहन देत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहाणे मॅडम यांनी केले. त्यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व शाळेच्या शैक्षणिक वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला व पालकांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका, शिक्षक, स्वयंसेविका, शाळा व्य. स अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांनी खूप मेहनत घेतली होती. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
