मुंबई / प्रतिनिधी :- समाजात अजूनही महिलांना समान संधी मिळत नसून विषमता वाढते तिथे हिंसा वाढते. त्यामुळे विषमतेचा सामना करणे हे मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन स्त्री मुक्ती संघटनेच्या संस्थापक शारदा साठे यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रमा प्रकाशनने आयोजित केलेल्या "आदिशक्ती अक्षरशक्ती" या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना देण्यात येणाऱ्या "आदिशक्ती अक्षरशक्ती" या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सन्मान स्विकारल्यानंतर त्या बोलत होत्या.
साठे पुढे म्हणाल्या की, आजकाल सर्व संस्थांमध्ये स्वार्थाचा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे आपला लढा अधिक कठीण झाला आहे. पुरुष स्त्रीचा शत्रू नसून सहकारी आहे. पितृसत्ताक समाजाची चौकट खिळखिळी करण्याची अजूनही गरज असून सर्वधर्म समभाव जोपासत असतानाच "आपले संविधान आपली गीता" आहे, असे समजले पाहिजे. स्त्रीचे प्रश्न हे फक्त स्त्रीचे नसून ते सर्व समाजाचे आहे. हिंसामुक्त जीवनाचा अनुभव मिळाला पाहिजे, असे सांगून त्यांनी स्त्री मुक्ती संघटनेच्या ५० व्या वर्षानिमित्त मोठे संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार, माजी खासदार कुमार केतकर यांनी समाज बदलण्याची अजूनही गरज असल्याचे सांगून मॉल, टिव्ही वगैरे बाबींनी आपल्याला मिळणारी सुखे ही इतरांच्या दुःखावर उभी आहे, हे विसरता कामा नये, याची जाणीव उपस्थिताना करून दिली.
आपल्या प्रास्ताविकात प्रकाश कुलकर्णी यांनी आपल्या जीवनात महिलांचे असलेले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन महिलांचा सत्कार करण्याची कल्पना आपल्याला स्फुरली असे सांगून नवशक्तीचे संपादक असताना, नवशक्तीच्या माध्यमातून आणि तिथून निवृत्त झाल्यावर स्वतःच्या रमा प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या महिलांना सात वर्षांपूर्वी पुरस्कार देण्याची सुरुवात कशी केली, किती चांगले अनुभव येत गेले, याचा थोडक्यात आलेख सादर केला.
या कार्यक्रमात ३००० प्रयोग झालेल्या "मुलगी झाली हो" या नाटकाच्या लेखिका ज्योती म्हापसेकर, कठपुतळी या लोकप्रिय मनोरंजन प्रकारातून समाज प्रबोधन करणाऱ्या मीना नाईक, थलसेमिया ग्रस्त बालकांसाठी आयुष्य वेचणाऱ्या सुजाता रायकर, पत्रकार, लेखिका, प्रकाशिका प्रज्ञा जांभेकर यांचाही आदिशक्ती अक्षरशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी या सर्व सन्मान मूर्तींनी आपापली समयोचित मनोगते व्यक्त केले.
यावेळी केतकर यांच्याहस्ते स्वामी समर्थ मंडळ, पालघर या संस्थेला ५ मुलींच्या वार्षिक खर्चासाठी ५५ हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे प्रमुख कमलाकर पाटील यांना प्रदान करण्यात आला. या पाच मुलींपैकी जी मुलगी पुढे गुणवत्तापूर्ण कामगिरी करीत राहील, तिच्या शिक्षणाचा खर्च रमा प्रकाशन करणार आहे.
आदित्य बिर्ला ग्रुपच्या फायनॅशियल्स प्रमुख स्मिता देव यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाश कुलकर्णी यांना सहकार्य करणाऱ्या काही व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सादर करण्यात आलेल्या बहारदार मराठी, हिंदी गीतांनी उपस्थितांची वेळोवेळी चांगली दाद मिळवली. निवेदिका अनुया गरवारे धारप यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण त्याचबरोबर हसत-खेळत निवेदन केले.
मिती ग्रुपच्या उत्तरा मोने यांची साथ लाभलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉं. किरण कुलकर्णी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, रसिक प्रेक्षकांची मोठी उपस्थिती लाभली होती.
