* पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा - मुंडे
परळी वैजनाथ / प्रतिनिधी :- परळी वैजनाथ तालुक्यातील नागरिकांनी परळी पंचायत समिती अंतर्गत व शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी मुंडे यांनी परळी पंचायत समितीच्या वतीने वडखेल येथे "एक दिवस गावकऱ्यांसोबत" ग्राम दरबार उपक्रमाप्रसंगी बोलत होते. वडखेल येथे "एक दिवस गावकऱ्यांसोबत" ग्राम दरबार उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारतातील 65 % लोकसंख्या आजही ग्रामीण भागात राहत आहे. ग्रामीण भागातील पुनरुत्थानासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले गेले. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील खेडी ही स्वयंपुर्ण, स्वयंशासीत असावीत अशी सर्व ग्रामस्थांची अपेक्षा असते. शासनाच्या विविध योजना, उपक्रम व सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहचविणे हेच सुप्रशासनाचे लक्षण आहे. याच मुद्द्यावर आधारीत ग्रामीण भागात काम करणा-या सर्व विभागांच्या अधिका-यांमार्फत प्रत्येक गावामध्ये विविध सेवा ठराविक कालावधीत पोहचविण्याच्या अनुषंगाने "एक दिवस गावक-यांसोबत (ग्राम दरबार)" हा नाविन्यापुर्ण उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद बीड व परळी वैजनाथ पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालय वडखेल यांच्या संयुक्त विद्यमाने "एक दिवस गावकऱ्यांसोबत..." हा ग्राम दरबारसारखा नवीन उपक्रम राबविण्यात आला होता.
या ग्राम दरबाराच्या निमित्ताने सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी मुंडे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. पंचायत समिती अंतर्गत व शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे अवाहन पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी मुंडे यांनी केले. शासनाच्या विविध विकास योजनेविषयी पंचायत समितीमधील सर्व विभाग प्रमुख यांनी ग्रामस्थ मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजना, उपक्रम, धोरण आणि सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचविण्याचा उद्देशाने या लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामपंचायत, शिक्षण, कृषी, महिला व बालकल्याण, आरोग्य, पशुसंवर्धन, समाज कल्याण, पाणीपुरवठा, स्वच्छता, सिंचन व जलसंधारण या संदर्भातील अडचणींवर सविस्तर चर्चा केली. तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. जनहिताचा निर्णय घेवून पादरर्शकपणे आयोजित केलेल्या या लोककल्याणकारी उपक्रमास ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
यावेळी पंचायत समिती परळीचे सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी मुंडे, पंचायत समिती धारूर सहाय्यक गटविकास अधिकारी शेषेराव कांदे, विस्तार अधिकारी साहेबराव भताने, एसआरएलएम विभागाचे सचिन हरणावळ, विस्तार अधिकारी अंबोरे, घरकुल विभागाचे बुरकुले, एमआरइजी चे कांदे, संजय जाधव पशुसंवर्धन विभागाचे डॉं. झिंगरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रत्नाकर देवकते, मुन्ना कराड तसेच सरपंच भारतबाई व्यंकटराव देवकते, उपसरपंच कौसाबाई चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य भागवत देवकते, अनुरथ खरात, भीमराव आगलावे, गंगाबाई घुमरे, लक्ष्मण गंगणे यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. विविध विभागामार्फंत चालविल्या जाणाऱ्या योजेनेची माहिती गावातील उपस्थित नागरिकांना देण्यात आली व वडखेल गावात आलेल्या विविध अधिकारी, कर्मचारी यांनी वडखेल गावात चालविल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती घेवून कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेबराव भताने यांनी केले तर आभार अंगद देवकते व गोविंद देवकते यांनी मानले.
