* पनवेलमध्ये बौद्ध समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा
पनवेल / साबीर शेख :- बिहार येथील बुद्धगया हे भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण जगातील बौद्ध बांधवांचे आस्था आणि श्रद्धेचे स्थान आहे. जगभरातील बौद्ध आपल्या आयुष्यात एकदा बुद्धगयेच्या महाबोधी विहाराला भेट देतात. महाबुद्ध विहार हे जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर झाले आहे. मात्र, या विहारावर बौद्धेतरांचे वर्चस्व असून सम्राट अशोकाने निर्माण केलेल्या महाबोधी महाविहाराचे स्वामित्व आणि व्यवस्थापन बिहार सरकारने काळा कायदा करून बळकाविल्यामुळे भारतातील समस्त बौद्धांनी याचा निषेध केला आहे. महाबोधी टेम्पल ॲक्ट रद्द करावा या मागणीसाठी भिक्खू संघाने बुद्धगया येथे भव्य आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच बौद्ध टेम्पल ऍक्ट रद्द करावा यासाठी पनवेल तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते प्रांत कार्यालय असा मोर्चा शेकडोंच्या संख्येने काढण्यात आला, यावेळी प्रांत अधिकारी पवन चांडक यांना निवेदन देण्यात आले.
बिहारमधील बुद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षापासून विहार असताना देखील त्याचा ताबा मात्र बौद्धेतर विशेषता ब्राह्मणी धर्मपंडितांकडे आहे. ही बाब जगातील सर्वच व्यक्तींना खटकत असून महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखीखाली कार्यान्वित असावे असा संविधानिक अधिकार आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून व्यापक लढा देखील सुरु आहे. सध्या बुद्धगया येथे जगातील सर्वच बौद्ध भिख्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करीत आहेत. याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पनवेल तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवाच्या वतीने आज मोर्चा यामध्ये बौद्ध समाजाच्या विविध धार्मिक सामाजिक, चळवळीतील पक्षाचे नेते कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता. यावेळी रिपाई जिल्हा प्रवक्ते मोहन गायकवाड, पनवेल महानगर पालिका क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
