खालापूर / सुधीर माने :- रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणवे निंबोडे येथे जागतिक महिला दिन अगदी आगळावेगळा साजरा करण्यात आला. प्रथमत: महिलांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये गॅदरिंगसाठी आवश्यक असणारे मुकुट व सजावटीचे साहित्य महिलांनी तयार करून आणले होते.
या कार्यक्रमासाठी खालापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे यांची उपस्थिती लाभली. प्रथमत: त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आले. नंतर खालापूर येथे आरोग्य खात्यात कार्यरत असणाऱ्या संगिता चव्हाण यांनी महिलांना विशेष मार्गदर्शन केले. शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा हर्षाली उतेकर यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समिती सदस्या व इतर महिला पालक वर्ग व पोषण आहार शिजवणाऱ्या काकी यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संगीता चव्हाण यांनी महिलांशी हितगुज केले व महिलांना होणारे आजार व आपण घ्यावयाची काळजी याविषयी योग्य ते मार्गदर्शन केले. महिलांनीही आपल्या काही समस्या त्यांच्याशी चर्चा करून सोडविल्या. अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. शेवटी मुख्याध्यापक दासरे सर यांनी आभार मानले.
