* चालू आर्थिक वर्षात १२७ कोटी रुपयांच्या बिलांची वसुली
ठाणे / अमित जाधव :- ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने थकबाकी आणि चालू बिल वसुलीची मोहीम आक्रमक केली असून गुरूवारी मोठे गृहसंकुल, टाॅवर येथे कारवाई करण्यात आली. ब्रम्हांड फेज तीन, लोढा क्राऊन, दोस्ती कोरोना आदी ठिकाणी कारवाई करून एका दिवसांत या भागातून ५० लाख रुपयांच्या बिलांची जागेवर वसुली करण्यात आली.
पाणी बील भरलेले नसल्याने दोस्ती कोरोना सोसायटीचा पाणी पुरवठा सकाळी बंद करण्यात आला. त्या संकुलाच्या पदाधिकाऱ्यांनी आठ लाख ६७ हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतर पाणी पुरवठा लगेच सुरू करण्यात आला. त्याचप्रमाणे, बाळकूम येथे लोढा क्राऊन आणि परिसरातील इमारतींवरही कारवाई करण्यात आली. संबंधित वेगवेगळ्या ग्राहकांनी एकूण सुमारे १३ लाख ५१ हजार रुपयांचा बिलाच्या रकमेचे धनादेश दिल्यावर त्यांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विविध विभागांच्या महसुलाच्या वसुलीचा आढावा घेतला होता. तसेच मार्च अखेर पर्यंतचा काही दिवसांचा उपलब्ध कालावधी उपयोगात आणून सर्व विभागांनी त्यांच्या वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, पाणी पुरवठा विभागाने उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या नेतृत्वात वर्तक नगर, लोकमान्य नगर आणि सावरकर नगर, माजिवडा-मानपाडा या प्रभाग समिती क्षेत्रात गुरुवारी वसुली मोहीम राबविण्यात आली. पाणी पुरवठा विभागाने या आर्थिक वर्षात आतापर्यंत थकबाकी आणि चालू बिलांच्या २२५ कोटी रुपयांपैकी १२७ कोटी रुपयांची वसुली केली आहे. ही वसुली गेल्यावर्षीच्या याच काळातील वसुलीपेक्षा १२ कोटी रुपयांनी अधिक आहे.