रोटरी क्लब खोपोलीतर्फे 'अभिजात मराठी'चा गौरव

खोपोली / प्रतिनिधी :- मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांनी चार दशकांहून अधिक काळ मराठी साहित्य शारदेची सेवा करीत उत्तम साहित्य लेखन केले. एखाद्या लेखकाचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा होणे ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे, अशी भावना केएमसी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख डॉं. भाऊसाहेब नन्नवरे यांनी व्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ खोपोली आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. रोटरीचे अध्यक्ष मिलिंद बावधनकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.  

२७ फेब्रुवारी हा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉं. नन्नवरे यांनी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही तर जीवनाच्या सर्व क्षेत्रात भाषेचे योग्य उपयोजन केले, अधिकाधिक वापर केला तर  मराठी भाषा अधिक समृद्ध होईल. भाषेचे संवर्धन करणे म्हणजे तिचा सर्व क्षेत्रात योग्य असा वापर करणे आवश्यक आहे. भाषा, समाज आणि संस्कृती हे तीनही घटक परस्परांशी संबंधित असून मानवी जीवन विकासात भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, असेही ते म्हणाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारात, शिक्षणाच्या सर्व स्तरावर आणि सर्व क्षेत्रात मराठीतून ज्ञान निर्मिती झाली तर मराठीचा अधिक विकास होण्यास मदत होते. त्यासाठी मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन उत्तम काम करीत आहे. त्याला समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.  

सामाजिक जाणिवेतून रोटरी क्लब ऑफ खोपोलीतर्फे अनेक उपक्रम सातत्याने राबविले जातात. समाज व संस्कृतीच्या विकासात मराठी भाषेचे योगदान लक्षात घेऊन या विशेष संवादसत्राचे आयोजन केल्याचे अध्यक्ष मिलिंद बावधनकर यांनी प्रास्ताविकातून सांगितले. रोटरीयन संजय पाटील यांनी परिचय करून दिला. याप्रसंगी रोटरीयन डॉं. नलिनी रामस्वामी, अनिल खालापूरकर, डॉं. रवींद्र टिळक, गौरव तिवारी, हेमंत नांदे यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. रोटरीयन सुनीता चव्हाण यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post