उल्हासनगर / नितीन पाटणकर :- होळी आणि धुलीवंदन (रंगपंचमी) हे सण उत्साहात आणि आनंदाने साजरे करण्याची आपली परंपरा आहे. मात्र, सणांच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी उल्हासनगर महापालिकेने नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. १५५ /२०११ अंतर्गत दिलेल्या निर्देशानुसार भारतामधील सर्व नागरिकांनी सण समारंभ हे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करणे आवश्यक आहे. त्यानुसार यंदाच्या १३ मार्च २०२५ रोजी होळी व १४ मार्च २०२५ रोजी धुलीवंदन साजरे करताना नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचा विचार करून काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
* पर्यावरणपूरक सणासाठी महत्त्वाच्या सूचना :-
- वृक्षतोड टाळावी : होळी साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड जाळले जाते, त्यामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते. यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो, तसेच प्रदूषण वाढते. म्हणूनच, महापालिकेने नागरिकांना पर्यायी पद्धतीने होळी साजरी करण्याचा सल्ला दिला आहे.
- पाण्याचा अपव्यय टाळावा : धुलीवंदन दिवशी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो, ज्यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे पाण्याची बचत करावी आणि कोरडी रंगपंचमी साजरी करावी, असा संदेश प्रशासनाने दिला आहे.
- ध्वनी प्रदूषण टाळावे : मोठ्या आवाजातील डीजे, ढोल-ताशे आणि स्पिकर्स यामुळे ध्वनी प्रदूषण होते, ज्याचा लहान मुले, वृद्ध, रुग्ण आणि वन्यजीवांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मर्यादित आवाजातच सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- रासायनिक रंगांचा वापर टाळावा : बाजारामध्ये रासायनिक रंग सहज उपलब्ध होतात, परंतु हे रंग त्वचेसाठी हानिकारक असतात तसेच पर्यावरणालाही हानी पोहोचवतात. त्याऐवजी फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग किंवा पारंपरिक गुलालाचा वापर करण्याचा सल्ला महापालिकेने दिला आहे.
- अश्लील भाषा व असभ्य वर्तन टाळावे : सणाच्या उत्साहात काही ठिकाणी अर्वाच्य भाषा, शिवीगाळ व गैरवर्तनाच्या घटना घडतात. त्यामुळे सणाच्या पवित्रतेला धक्का न लावता, सद्भावना आणि आनंद यांचा संदेश देणारा सण साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
- प्लास्टिकमुक्त सण : प्लास्टिकच्या पिशव्या, फुगे आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते, ज्यामुळे पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतो. महापालिकेने नागरिकांना प्लास्टिकचा वापर कटाक्षाने टाळण्याचे आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
उल्हासनगर महापालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, आपले परंपरागत सण साजरे करताना निसर्ग आणि जीवसृष्टीची हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. निसर्ग संवर्धन व पर्यावरण रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे आपण सर्वजण एकत्र येऊन पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करू या आणि महापालिका प्रशासनास सहकार्य करू या. महापालिकेच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनीही पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संकल्प केला आहे.
