* कचरा गाड्या मनसेने ४ तास रोखल्या
ठाणे / अमित जाधव :- दिव्यात पुन्हा छुप्या पद्धतीने नवीन डंपिंग सुरु झालेले पहावयास मिळत असून सदर जागेवर आता ठाणे मनपाच्या अनेक गाड्या कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे. दिवा शहरातील साबेगाव ते चूहा पुल रोडवर कचरा टाकून पुन्हा दिवेकरांच्या नशिबी प्रदूषणाचा विळखा बसणार आहे. दिवा खाडी किनारी दररोज कचऱ्याच्या गाड्यांची वर्दळ वाढलेली दिसून येत असून खाडी किनारी या गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत. मात्र, या गाड्या नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरु करण्यात आल्या आहेत याची माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पुन्हा कचरा टाकण्यास नव्या विरोधाला दिवा मनसेच्या वतीने सुरुवात झाली आहे. सुरुवातीस दिवा, डायघरनंतर भंडार्ली येथे डंपिंगला विरोध झाल्यावर आता छुप्या पद्धतीने हे नवीन डंपिंग सुरु झाल्याचे दिसून येऊ लागल्याने दिवा मनसे आक्रमक झाली असून मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सदर डंपिंगकडे जाणाऱ्या व येणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कचरा गाड्या चार तास रोखल्या होत्या.
ठाणे मनपाकडून दिवा खाडी किनारी टाकला जाणारा कचरा हा नक्की कोणाचा आणि तो कोणाच्या सांगण्यावरुन टाकण्यात येत आहे हे अजून ही कळाले नसल्याने व सदर ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांची कुळकायदा जमीन असून कचरा टाकण्याला विरोध करणार असल्याचे मनसे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील व मुंब्रा येथील शेतकरी गणेश पाटील यांनी स्पष्ट केले असून आता संघर्ष पेटण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. नव्या डंपिंगमुळे दिवेकरांमध्ये नाराजी वाढत आहे. कल्याण ग्रामीण भागातील वाढत्या कचरा कोंडीमुळे प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित होणार आहे. मात्र दिव्यातील डम्पिंग बंद केल्यांनतर आता पुन्हा नवे डम्पिंग सुरु झाले नाही ना ? असा प्रश्न उपस्थित नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. तसेच खाडी किनारी असलेल्या जैवविधतेला धोका निर्माण झाला आहे. तर या कचऱ्याच्या गाड्या कोण थांबविणार हे पाहणे आता महत्त्वाचे असून टाकण्यात येणारा कचरा कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता टाकण्यास सुरुवात झाली असून दिवा मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील व मुंब्रा येथील शेतकरी गणेश पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत आम्ही न्यायालयीन संघर्ष करू असे स्पष्ट केले आहे.