* सहायक आयुक्त : थकीत बिलाच्या दंडात्मक रकमेवर 31 मार्चपर्यंत 100 % सूट
ठाणे / अमित जाधव :- ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणी बिलावर प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट देणारी अभय योजना जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त सौरव राव यांनी घेतला आहे. थकीत पाणीपट्टी बिलावरील 100 टक्के दंड माफ करण्याची ठाणे मनपाची अभय योजना जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून सदर अभय योजनेची सवलत 31 मार्चपर्यंत असून योजनेचा लाभ नागरिकांनी तात्काळ घ्यावा, असे आवाहन दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त राजेंद्र गिरी यांनी केले आहे.
सदर अभय योजनेचा लाभ दिवा शहरातील पाणीपट्टी थकबाकीदारांना 31 मार्च 2025 पर्यतच्या थकीत पाणीपट्टी कराच्या दंडाची रक्कम पूर्णत: माफ करुन भरीव सूट देणारी थकबाकीदारांसाठी लाभदायी अशी ही योजना आहे. ही रक्कम थकबाकीदारांनी एकाचवेळी भरणा करावयाची असून ती टप्याटप्यांनी भरता येणार नाही तसेच सदर अभय योजनेच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 31 मार्च 2025 पर्यत नागरिकांनी पाणी बिलाची थकीत रक्कम भरणा करुन या योजनेचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी मिळाली असून पालिकेच्या या धोरणात्मक निर्णयामुळे ज्या घरगुती संयोजनधारकांनी पाणीपट्टी जमा केली नसेल अशा घरगुती नळ संयोजनधारकांनाच सदरची योजना लागू असणार आहे तसेच व्यावसायिक नळ संयोजन धारकांनाही ही सवलत लागू असणार नाही. तर 1 एप्रिल 2025 पासून थकबाकी प्रलंबित ठेवणाऱ्या बिल धारकांवर जप्तीची ठोस कारवाई करण्यात येईल, असे दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त यांनी बोलतांना स्पष्ट केले आहे.
