सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेनेचा जाहीर मोर्चा

कर्जत / जयेश जाधव :- बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कर्जत-खालापूरमधील शिवसेना पक्षाच्या वतीने कर्जत टिळक चौकात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोर्चात सरपंच देशमुख यांच्या हत्येमागे असणाऱ्या सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.  

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या ही केवळ एक गुन्हा नाही, तर माणुसकीवरचा मोठा डाग आहे. गावाच्या हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱ्या देशमुख यांना निर्दयपणे संपवले जाणे ही क्रूर आणि संतापजनक घटना आहे. बीड जिल्ह्यात आपले दहशतीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड वाल्मिक कराडने अनेक निष्पाप नागरिकांपासून ग्रामसेवक, सरपंच, नगरसेवकांपर्यंत सर्वांना धाकात ठेवले. संतोष देशमुख यांच्या हत्येने त्याच्या अमानुष प्रवृत्तीचा कळस गाठला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये "वाल्मिक कराडला भर चौकात फाशी द्या", अशी ठाम मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली. गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांवर तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशा मागणीचे एक लेखी निवेदन कर्जत पोलिस ठाण्यात देण्यात आले.

याप्रसंगी आंदोलनात शिवसेनेचे रायगड उपजिल्हाप्रमुख  भाई गायकर, तालुका प्रमुख सुदाम पवाळी, तालुका संघटक शिवराम बदे, विभाग प्रमुख शिवाजी देशमुख, जिल्हा संघटक संभाजी शेठ जगताप, विभाग प्रमुख  रत्नाकर बडेकर, विलास मोडक, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, रवींद्र शिर्के, सरपंच नाथा आगज, मानसी कदम यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post