* युवती व महिला सक्षमीकरणासाठी आ. महेंद्र थोरवे आणि कर्जतकरांनी घेतली धाव
कर्जत / प्रतिनिधी :- येथील एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण देणारी शिक्षण संस्था म्हणून ओळख असणारी शैक्षणिक संस्था विजयभुमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून युवती व महिला सक्षमीकरणासाठी तसेच भविष्यात महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आ. महेंद्र थोरवे यांनी विशेष पुढाकार घेत पोसरी शिवतीर्थ येथे सन २०२५ च्या कन्याथॉन मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन विजयभुमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशनच्या माध्यमातून केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून धावपट्टूंनी हजेरी लावून कर्जतकरांची मने जिंकून घेतली. तर, सुमारे चार हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉन स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. यानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकांमध्ये मुलींची उपस्थिती लक्षणीय होती.
रविवार, २ मार्च रोजी सकाळी सहा वाजता कर्जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्यदिव्य कन्याथॉन मॅरेथॉनमध्ये सुमारे चार हजारपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. ३ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि १० किलोमीटर अंतरासाठी कर्जत तालुक्यातील विविध शाळा, माध्यमिक विद्यालय, कॉलेजचे हजारों विद्यार्थी तसेच अनेक क्षेत्रातील दिग्गजांसह वयोवृध्द आणि दिव्यांगांनी आपली उपस्थिती लावून महिला सक्षमीकरणासाठी आयोजित केलेल्या कन्याथॉन मॅरेथॉनमध्ये सहभाग दर्शवून अनेकांना प्रेरणा देण्याचे काम केले.
१० किलोमीटरमध्ये प्रवीण कांबळे, दामिनी चंद्रकांत पेडणेकर, ५ किलोमीटरमध्ये स्वराज देवानंद पाटील, प्रणाली उमेश सावंत तर, ३ किलोमीटरमध्ये मंगेश पार्डी, धनश्री सुनील कराले यांनी बाजी मारली आहे. तसेच यंदाचा कन्याथॉन स्कॉलरशिप पारितोषिक सायली भोसले व बेबी खातून यांना प्रदान करण्यात आली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेसाठी केलेल देखणे आणि निटनेटके आयोजन, आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका आणि तज्ज्ञ डॉंक्टरांची टीम, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाची असलेली कडक व चोख व्यवस्था यामुळे ही स्पर्धा अत्यंत जल्लोषमय व आनंदी वातावरणात यशस्वी झाली. विजयभूमी युनिव्हर्सिटीचे ट्रस्टी संजय पडोडा व कल्पना पडोडा यांच्या अनुपस्थितीत विजयभूमी युनिव्हर्सिटीचे स्टाफ, कर्मचारी व विद्यार्थी यांनी या स्पर्धेसाठी घेतलेली विशेष मेहनत ही वाखाणण्याजोगी ठरली आहे. कर्जत पोसरी येथील कन्याथॉन मॅरेथॉन स्पर्धेसाठी कर्जत विधानसभेचे आ. महेंद्र थोरवे, धावपटू प्रियंका ओझा, वाईस चांसलर डॉं. रविकेश श्रीवास्तव, रजिस्ट्रार नितिन श्रीवास्तव, ॲंडमिन हेड राजू पुजारी, असिसंट रजिस्ट्रार सुरेश राव, बापु चित्ते, ॲंड संकेत भासे, विजयभूमी युनिव्हर्सिटीचे स्टाफ व विद्यार्थी यांसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी कर्जत पोसरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कन्याथॉन मॅरेथॉनमध्ये विद्यार्थ्यांसह सर्व स्तरांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरणासाठी दर्शविलेला पाठिंबा हा पुढील काळात महिलांना त्यांच्या विविध कार्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
- महेंद्र थोरवे
आमदार, कर्जत विधानसभा