* बाजारपेठ बंद, रस्त्यांवर शुकशुकाट
कर्जत / जयेश जाधव :- माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे वाढते फसवणुकीचे प्रकार रोखण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून माथेरान बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलेल्या या आवाहनाला माथेरानकरांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.
माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची दस्तुरी नाका येथे घोळका करून उभ्या राहणाऱ्या अश्वचालक, कुली, एजंट यांच्याकडून दिशाभूल केली जाते. त्यांची चुकीची माहिती देऊन फसवणूक केली जात असल्याचे समोर आले होते. येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक रोखा अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने माथेरानच्या प्रशासकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र प्रशासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने मंगळवारपासून माथेरान बेमुदत बंदची हाक दिली होती. संघर्ष समितीच्या या मागणीला माथेरानकरांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
माथेरान व्यापारी संघटना, हॉटेल असोसिएशन, राजकीय पक्ष, ई-रिक्षा संघटना, विविध सामाजिक संघटनांनी या बंदला पाठींबा दिला आहे. त्यामुळे मंगळवारी माथेरानची बाजारपेठ, हॉटेल्स, हातरिक्षा, ई रिक्षा शंभर टक्के बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता. पर्यटकांची वर्दळही कुठेच दिसून येत नव्हती. दरम्यान बंदच्या पार्श्वभूमीवर माथेरानमध्ये वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
