ती रक्त चंदनाची पहाट

मी विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. उन्हाळा जोरात सुरू झाला होता. सकाळी आठ वाजता जोराने ऊन लागत होते. रस्त्याच्या कडेला पळसाच्या झाडावर लालभडक असलेली फुले। लक्ष वेधून घेत होती. एक व्यक्ती धोतर कमरेला खोवून पळसाच्या झाडावर चढून फुले तोडत होती. त्या व्यक्तीला पाहून मला राहवले नाही. मी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि त्या वर चढलेल्या व्यक्तीला म्हणालो, दादा जरा दोन-चार फुले मला द्या ना. माझा आवाज ऐकून त्या व्यक्तीने हातामध्ये असणारी फुले माझ्या दिशेने खाली फेकली. मी त्या फुलांचा झेल घेण्याचा प्रयत्न केला, त्यातून अर्धी फुले हातात राहिली आणि आर्धी फुले खाली पडली. असे वाटत होते, त्या फुलांच्या स्पर्शाने धरणीमाता ही आनंदून गेली असेल. हातात पडलेली ती फुले मी तशीच छातीला घेऊन कवटाळली. त्या फुलांमुळे वसंत ऋतू एवढ्या उन्हामध्ये किती प्रसन्नतेने आपलं स्वागत करीत आहे, असेच मनोमनी वाटत होते. मी ती फुले घेऊन आता निघणार, तितक्यात माझे लक्ष त्या फुले तोडणाऱ्या व्यक्तीकडे गेले. तो इतक्या गडबडीने एवढी फुले का तोडत असेल, असा मला प्रश्न पडला होता. तो फुले तोडायचा आणि त्या रिकाम्या थैलीमध्ये टाकायचा. त्या व्यक्तीची थैली आता भरत आली होती. मी थोडे जवळ जावून त्या व्यक्तीला विचारले, एवढे फुले कशाला हवी आहेत. तो म्हणाला, रंग करायला. मला माझे बालपण आठवले, मी लहानपणी होळीला याच फुलांचा रंग करायचो. मी त्या व्यक्तीला म्हणालो, तुम्ही फार हौशी दिसताय. या काळातही ह्या फुलांचा रंग करताय म्हणजे कमाल आहे तुमची. तो म्हणाला, साहेब मुलींसाठी करतोय, त्यांना या मुलांचा रंग फार आवडायचा. त्यांच्या आठवणीत मी आणि माझी बायको दोघेजण दर वर्षी रंगपंचमीला त्यांच्या समाधीला या फुलांच्या रंगाची अंघोळ घालतोय. मला त्या वडिलांची असलेली भावना पाहून आश्चर्य वाटलं. मी काही न बोलता तिथेच थांबलो. तो माणूस खाली आला. कमरेला खोवलेले धोतर त्याने सोडले. त्याच धोतराने त्याने डोक्यावर आलेला घाम पुसला. मी म्हणालो, काय झाले होते मुलीला. तो म्हणाला, काय सांगावे, साहेब, खूप मोठी कहाणी आहे. जाऊ द्या. काळाने माझ्या दोन्ही मुली माझ्यापासून हिरावून घेतल्या. तो त्या पुढे काहीही न बोलता पुढे जात होता आणि मी त्याच्या मागे. आमचे बोलणे सुरू असताना तो व्यक्तीमध्येच म्हणाला, साहेब वाट छोटी आहे. त्यात आजूबाजूने इर्षेतून भावकीने काटे टाकले आहेत. मी म्हणालो, भावकीने अर्जुनालाही सोडले नाही, आपण कोण? माझे बोलणे एकूण तो व्यक्तीही हसला. आता तो माझ्याशी बोलण्यात हळूहळू खुलत होता. आमचे बोलणे सुरू असताना, दुरून एका महिलेने आवाज दिला. अहो काय करून राहिले, चला ना लवकर किती वेळ आहे अजून, मला उन्हाच्या अगोदर घरी पोहचायचे आहे. मला त्या व्यक्तीच्या मागे पाहून त्या बाईच्या आवाजाचा सूर थोडा कमी झाला. आम्ही आंब्याच्या झाडाखाली असलेल्या लाकडी पलंगावर बसलो. बाजूला पाण्याचा माठ भरला होता. त्या माठातले पाणी थंड रहावे यासाठी त्यावर ओले करून फडके टाकले होते. ती व्यक्ती त्यांच्या बायकोला माझी ओळख करून देत म्हणाली, साहेब मुंबईचे आहेत. यवतमाळला जात आहेत. राजश्री आणि विजयश्री विषयी त्यांना मी सांगितले, त्यांनी फार वाईट वाटले. बोलत बोलत आले माझ्यासोबत. त्या माऊलीने  मान हलवत मला पाणी दिले. मी ती व्यक्ती आणि त्यांची पत्नी आम्ही बोलत बसलो. कुणाच्याही वाट्याला एवढे दुःख येऊ नये, एवढे दुःख या दोघांच्या वाट्याला आले होते. जगावे तर का ? आणि मरावे तर का ? असा प्रश्न त्या दोघांच्या समोर निर्माण झाला होता. शेतकरी मोठा असो की छोटा, सततची नापिकी, पिकले तर चांगला भाव नाही, हे सर्व शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले. शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था कोणी विचारू नये आणि कुणी सांगूही नये अशीच होती आणि आहे ही.                    

मी ज्यांच्याशी बोलत होतो ते त्रंबक जाधव आणि त्यांची पत्नी देवकी जाधव यवतमाळपासून जवळच एका खेडेगावात राहतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जित २७ एकर जमीन होती. त्यातून विकून विकून त्यांच्याकडे आता तीन एकर जमीन आहे. त्यांच्या राजश्री आणि विजयश्री या दोन मुलींनी दोन वर्षांपूर्वी स्वतःचे आयुष्य संपवले. राजश्री आणि विजयश्री या दोघींच्या लग्नाची घरात चर्चा सुरू होती. पाहुणे यायचे, पसंत करायचे आणि हुंड्यासाठी आग्रह धरायचे, मोठे लग्न करून द्या म्हणून आग्रह धरायचे. खूप मागणीमुळे लग्न काही जमेना. त्रंबक आणि त्यांची पत्नी देवकी यांची काळजी दिवसेंदिवस वाढत होती. आई वडिलांना होणारा त्रास दोन्ही मुलींना पाहवत नव्हता. त्याच काळात हुंड्यासाठी, कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बातम्या सतत कानावर पडत होत्या. त्रंबक म्हणाले, माझ्या दोन्ही मुली मरणाच्या आठ दिवस अगोदर रात्री एक झोपायची एक जागी राहायची. आम्हा नवरा-बायकोला हे का होत होते हे कळाले नाही. आम्ही जेव्हा खोलीमध्ये जाऊन माहिती घेतली तर कळाले. मी काही टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या वगैरे तर करणार नाही, याची काळजी त्या त्या दोघींना वाटायची, म्हणून त्या रात्री जागी राहायच्या, माझ्या मागे मागे शेतात यायच्या. मरणाच्या आदल्या रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या, दोन्ही पोरी खूप मोठ्या झाल्यासारख्या आम्हाला बोलत होत्या. आमच्या दोघांचे पाय दाबत होत्या. बाबा तुम्हाला कशाचेही टेन्शन येणार नाही, तुम्ही नका काळजी करू. पुढच्या जन्मी आम्ही दोघीही मुले म्हणून तुमच्या पोटाला जन्माला येऊ. चंदनाचा लेप उगाळताना मुलींच्या गप्पा सुरू होत्या. राजश्री म्हणाली, बाबा मी पळसाची फुले रंगासाठी भिजवली आहेत, या वर्षी तुम्हीही आमच्यासोबत रंग खेळाल ना ? आम्ही दोघी कुठेही असो, बाबा आम्हाला दर रंगपंचमीसाठी याच फुलांचा रंग पाहिजे हा ? त्रंबक म्हणाले, हो बेटा, नक्की मिळेल, का नाही. असे आम्ही दोघे बोलताना मध्येच देवकी म्हणाल्या, दोन्ही मुली अशा का बोलतात याचे मला खूप आश्चर्य वाटले, त्रंबक म्हणाले, का कुणास ठाऊक, त्या रात्री सकाळी सकाळी काहीतरी वाईट घडणार आहे, असे मला मनोमनी वाटत होते. त्या दिवशी सकाळी सकाळी घरात दोन मांजरांच्या भांडणात डब्बे खाली पडले आणि  आम्हाला जाग आली. आमची दोघांची नजर मुलींच्या अंथरुणाकडे गेली, तिथे मुली नव्हत्या. आमच्या पोटात एकदम धस्स झाले. अशा मुली न सांगता कुठेही गेल्या नाहीत, एकदम गेल्या कुठे असे आम्ही एकमेकांना विचारत होतो. तेव्हढ्यात माझ्या भावाचा मुलगा पळत घरी आला आणि म्हणाला, मोठे बाबा शेताकडे चला, दोन्ही पोरींनी फाशी घेतली. आम्ही रडत पडत शेतात गेलो, तेव्हढ्या सकाळी अवघे गाव आमच्या शेतात जमले होते. आम्ही रात्री झोपलो होतो, पण मुलींनी झोपल्याचे सोंग घेतले होते. आम्ही झोपल्यावर मुली घरातला मोठा दोर घेऊन कधी शेतात गेल्या आम्हाला कळाले नाही. सकाळी आम्ही शेतात जाऊन पाहिले तर काय दोन्ही मुलींनी गळ्याला फास लावून आत्महत्या केली होती. त्या झाडाला लटकत्या मुली पाहून आम्ही दोघेही बेशुद्ध पडलो. आम्हाला जाग आली तेव्हा दोन्ही मुली स्मशानात होत्या. आम्हीही तिथे पोहचलो. रडण्यासाठी शरीरात ताकत नव्हती. रात्री जे चंदन मुलींनी उगाळून काढले होते, ते चंदन पहाटे रक्त चंदन होऊन येईल असे कधी वाटले नव्हते. ते दोघेही मुलींची आत्महत्याची कहाणी सांगून हमसून हमसून रडत होते.          

त्या दोघांची समजूत काढण्याची माझी हिंमत होत नव्हती. शेवटी रडून रडून रडणार तरी किती ? ते दोघेही उठले, स्वतःला सावरत त्यांनी त्या पळसाच्या फुलांचा रंग केला. ज्या ठिकाणी त्या दोन्ही मुलींची समाधी होती, तिथे तो रंग टाकला. एकीकडे त्या पळसाच्या फुलांचा अभिषेक त्या मुलींच्या समाधीवर होत होता, तर दुसरीकडे अभिषेक करणाऱ्या आईबाबांच्या डोळ्यांतील अश्रूही त्या रंगात मिसळत होते. ते सारे दृश्य पाहून माझ्यासारख्या हळव्या मनाच्या माणसाचे अश्रू डोळ्यांतून बाहेर येत होते. 

त्यांना थोडी बहुत मदत करून, मी त्या दोघांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. शेती करणाऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे, याचे देणे घेणे कुणालाही नाही. त्रंबक जाधव आणि त्यांची पत्नी देवकी जाधव यांच्यासारखे हतबल शेतकरी कुटुंब आपल्या अवतीभवती तुम्हाला भेटतील, त्यांना नक्की मदत करा, त्यांना आधार द्या बरोबर ना.

- संदीप काळे

मो. 98900 98868


Post a Comment

Previous Post Next Post