खोपोलीत भव्य महिला बाईक रॅली

* मराठमोळ्या थाटात महिला दिन उत्साहात संपन्न

खोपोली / दिनकर भुजबळ :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खोपोलीत नागरी सामाजिक विकास संस्था आणि उपविभागीय पोलिस अधिकारी, खालापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आणि ऐतिहासिक महिला बाईक रॅली संपन्न झाली. मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत, नऊवारी साड्या, फेटे आणि नथ घालून महिलांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांचा आणि युवतींचा प्रचंड उत्साह ओसंडून वाहत होता.

रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादनाने झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम आणि संस्थेच्या अध्यक्षा वर्षा राजेश मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विक्रम कदम यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करून त्यांना शिवरायांची प्रतिमा भेट देण्यात आली.

* खोपोलीच्या रस्त्यांवर मराठमोळा उत्सव :-

बाईक रॅलीने संपूर्ण खोपोली शहर दणाणून गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेली ही रॅंली खोपोली बाजारपेठ मार्गे डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी येऊन विसर्जित झाली. या प्रवासात महिलांनी आपल्या ऊर्जा, आत्मविश्वास आणि एकजुटीचे दर्शन घडविले.

रॅलीच्या समारोपानंतर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ओमकार भजनी मंडळ आणि विरेश्वर महिला भजनी मंडळाने गाजलेल्या पोवाड्यांची सुंदर प्रस्तुती केली. सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी अप्रतिम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर परिवर्तन नाट्य कला संस्थेने समाजातील स्त्री जीवनावर आधारित मूक अभिनय सादर करून उपस्थितांना विचार करायला लावले.

* "नारीरत्न सन्मान" महिलांचा गौरव :-

महिला दिनानिमित्त खोपोलीतील कर्तृत्ववान महिलांचा "नारी रत्न सन्मान" पुरस्काराने सन्मान करण्यात आला. वैशाली अर्जुन डोईफोडे - ध्येयवादी शिक्षिका, शुभलक्ष्मी श्रीराम पाटणकर - गतिमंद मुलांसाठी आधारवड, शशिकला विलास लोखंडे - अध्यात्मिक परंपरा जपणारी माऊली...यावेळी संस्थेच्या अध्यक्षा वर्षा राजेश मोरे यांनी सांगितले की, नागरी सामाजिक विकास संस्था नेहमीच महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत राहील आणि महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहील.

या भव्य आयोजनाला खोपोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शितल राऊत, पोलिस अधिकारी, कर्मचारी, संस्थेच्या महिला पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्व महिला, युवती, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणि हितचिंतकांना नागरी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

खोपोलीतील या ऐतिहासिक महिला बाईक रॅंलीने "स्त्री शक्ती"चा अभिमान व्यक्त केला आणि भविष्यात अशा उपक्रमांची पार्श्वभूमी निर्माण केली!


Post a Comment

Previous Post Next Post