* जाहिरात फलकांचे लोखंडी सांगाडे भंगारात विकणार
ठाणे / अमित जाधव :- ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा तसेच धोकादायक जाहिरात फलक ठेकेदाराने स्व:खर्चाने काढून भंगारात विकून त्या मोबदल्यात पालिकेला पैसे देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार पालिकेने दोन वर्षांसाठी भंगार विक्रीचा ठेका देण्यासाठी दरपत्रके मागविली असून यानुसार पालिकेकडे प्राप्त झालेल्या चारपैकी एकाचा दर २६ रुपये ७० पैसे इतका आहे. हा दर तीन दरपत्रकांपेक्षा जास्त असल्याने त्यास पालिकेच्या प्रशासकीय सभेने मान्यता दिली आहे. यामुळे पालिकेला आता भंगार विक्रीतून पालिकेला प्रति किलोमागे २६ रुपये ७० पैसे मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
घाटकोपरमधील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाण्यातील बेकायदा जाहिरात फलकांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावरून टिका होऊ लागताच ठाणे महापालिकेने बेकायदा जाहिरात फलकांविरोधात कारवाई सुरू केली होती. या कारवाईत शहरातील ४९ जाहिरात फलकांवर पालिकेने कारवाई केली होती. ४९ पैकी ५ जाहिरात फलक पुर्णपणे निष्कासित करण्यात आले होते, तर परवानगीपेक्षा जास्त आकाराच्या ४४ जाहिरात फलकांचा अतिरिक्त भागाचा फक्त पत्रा काढण्यात आला होता. याशिवाय, पाालिकेने जाहिरात फलकांचे लोखंडी सांगाडे धोकादायक आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी संबंधित कंपनी मालकांना फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. यानुसार २६० जाहिरात कंपन्यांनी जाहिरात फलकांचे स्थैर्यता प्रमाणपत्र पालिकेकडे सादर केले होते. या पाठोपाठ आता पालिकेने बेकायदा आणि धोकादायक फलकांचे लोखंडी सांगाडे नियुक्त ठेकेदाराने स्व:खर्चाने काढून घेऊन भंगारात विकणे आणि त्या बदल्यात पालिकेला किलोमागे पैसे देणे, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या संबंधीचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. त्यास आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर तो प्रशासकीय सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यास प्रशासकीय सभेनेही मान्यता दिली आहे.