अवैध हत्यार विक्रेत्यांचा उमर्टी गावात पोलिसांवर हल्ला

* हवेत गोळीबार एपीआय सह दोघे जखमी

* वरला पोलिसांच्या मदतीने बंधकांची सुटका

* आरोपी पप्पीसिंह शिकलककर यास अटक

चोपडा / महेश शिरसाठ :- उमर्टी गावात गावठी कट्टा तयार करणाऱ्या आरोपितास ताब्यात घेणाऱ्या पोलिस पथकांवरच दगडफेक करून उलटपक्षी पोलिसांनाच पकडून एपीआय व दोन पोलिसांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. एका पोलिस कर्मचाऱ्यास बंदी बनवून घेत आमच्या माणसाला सोडा नाहीतर या पोलिसास सोडणार नाही, असा पवित्रा घेत हवेत गोळीबार करण्यात आला तर पोलिसांमार्फतही  दुसऱ्या बाजूने हवेत गोळीबार करण्यात आल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर जळगाव व चोपडा पोलिसांच्या जवळपास 18 ते 25 गाड्यांचा तर एमपी पोलिसांच्या 6 गाड्यांचा चम्मू दाखल झाल्याने मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने बंधक पोलिसांची सुटका करण्यात आली. आरोपी पप्पीसिंह शिकलककर यास अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींवर जीवघेणा हल्ला, आर्म अॅक्ट, किडनैपिंग आदी कलमाद्वारे गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी वृत्तपत्र प्रतिनिधींशी बोलताना दिली. 

याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पथक गोपनीय माहितीच्या आधारावर साध्या वेशात उमर्टी येथे  अनधिकृत गावठी कट्टा विकणारा आरोपी पप्पीसिंह शिकलककर यांस पकडण्यासाठी गेले व त्यांस  पकडण्यात पोलिसांना यशही आले. मात्र, ही बाब तेथील अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांना समजल्यावर काही 100 ते 150 लोकांचा समूह एकत्र येत पोलिसांवर हल्ला चढविला. दोन्ही बाजूंनी हवेत गोळीबार करण्यात आला, त्यात पोलिस अधिकारी व दोन पोलिस जमावाच्या हाती लागल्याने त्यांना मारहाण केली आहे. पोलिस कर्मचारी किरण अशोक पारधी व एपीआय निनतवरे यांना हातापायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे. दरम्यान, एका पोलिस कर्मचारीस जमावाने बांधून ठेवले. या घटनेचे वृत्त वरिष्ठ पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर उमर्टी गावात नऊ वाजेच्या सुमारास जवळपास 25 ते 30 गाड्यांचा ताफा पोलिस गाड्यांचा ताफा दाखल झाला. शिवाय वरला व एमपी पोलिसांची कुमक मागविण्यात आली, त्यांनी जोरदार शर्थीचे प्रयत्न करीत बंधक पोलिस कर्मचारी शशी पारधी यास वरला पोलिसांनी ताब्यात घेऊन चोपडा पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेची वार्ता चोपडा शहरसह जिल्हाभर पसरल्याने अफवांनाही जोर धरला.

या घटनेची पोलिस अधिक तपास करीत आहेत आणि संशयितांविरुद्ध कडक कारवाईची तयारी करीत आहेत. घटनास्थळी असलेल्या सर्व आरोपींना पकडण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांना सोबत घेत शोध मोहीम सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post