खोपोली / सुधीर माने :- जयराम स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये जयरामस्वामी विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज आर. डी.घार्गे सरांच्या संकल्पनेप्रमाणे आजही कार्यरत आहे. शाळेचे माजी विद्यार्थी मित्र एसएसएसी परीक्षेनंतर भेटत नाहीत म्हणून वेगवेगळ्या बॅचचे विद्यार्थी स्नेहसंमेलन आयोजित करतात. त्याच स्फूर्तीने आमच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व्हावे म्हणून वर्ग मित्र दिनकर भुजबळ यांनी दिलीप आनंदा घार्गे, अरुण जाधव सर, सुनील दळवी, नंदकुमार घार्गे, शिरीष घार्गे, प्रदीपकुमार घार्गे, महादेव शिंदे त्याचप्रमाणे डॉं. विजय भंडारे व वसंत अवघडे यांच्याजवळ संकल्पना मांडली आणि या सर्वांनी यांस प्रतिसाद दिला.
दिनकर भुजबळ यांनी "आम्ही शाळकरी" एसएससी १९७७-१९७८ बॅचमधील सर्व मित्र मैत्रिणींचा ग्रुप तयार केला. या माध्यमातून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचा फोन नंबर मिळवून व्हॉटसअप ग्रुप तयार करून सर्वांशी संपर्क केला. बॅचमधील विद्यार्थी कोणी डॉंक्टर, कोणी इंजिनीयर, कोणी शासकीय कर्मचारी, कोणी बँक कर्मचारी, पोलिस निरीक्षक आहेत, तर कोणी बळी राज्याच्या भूमिकेत कार्यरत आहेत. प्रत्येकजण आपल्या व्यवसायात पारंगत आहे. या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एकत्र बोलवून सर्वांचा स्नेहसंमेलनाचा, स्नेहभोजनाचा कार्यक्रम व्हावा म्हणून विशेष प्रयत्न करण्यात आले. सर्वांच्या प्रतिसादामुळे १६ फेब्रुवारी २०२५ रोजी शाळेच्या प्रयोग शाळेत व सांस्कृतिक भवनमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
बॅचमधील विद्यार्थी एसएसएसी परीक्षेनंतर तब्बल ४७ वर्षांनी एकत्र भेटणार होते. त्यामुळे त्याची पराकोटीची उत्सुकता होती. हा दिवस प्रत्येकासाठी आनंदाचा होता. कार्यक्रमाच्या दिवशी साधारणपणे ४५ विद्यार्थी विद्यार्थीनी हजर होते. ठरल्याप्रमाणे कार्यक्रम नियोजित वेळेत सुरू झाला. बॅचच्या वेळी असणारे नवरत्न शिक्षकापैकी सर्वश्री दुटाळ सर, आर. जी. कुलकर्णी सर, कुंदप सर, एस. आर. घार्गे सर, श्रीमती चव्हाण मॅडम हजर होते. आयाचित सर आणि नकाते सर काही कारणास्तव येऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी व्हिडिओ कॉल करून त्यांच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात करतांना अरुण जाधव सर यांनी प्रास्ताविक भाषण केले. प्रथम जे विद्यार्थी व जे शिक्षक आपल्यात नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अरुण जाधव सरांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी शाळा सुरू झाल्यापासून ते आजपर्यंतचे मुद्दे मांडले. त्यानंतर दिनकर भुजबळ यांनी स्नेहसंमेलन का करावे ? याचे सविस्तर विचार मांडले. दिनकर भुजबळ एक धाडसी गिर्यारोहक, एक चांगले पत्रकार आहेत. रायगड जिल्ह्यात त्यांचे चांगले सामाजिक कार्य आहे.
तसेच डॉं. विजय भंडारे यांनी त्यांचे अभ्यासू भाषण केले. ते पुण्यातील आयुर्वेदिक कॉलेजचे प्रिसिपल होते. दिलीप घार्गे, शिरीष घार्गे, सुनील दळवी, आर. बी. शिंदे, जयश्री माने, छाया यादव, पद्मजा माने, अक्काताई दुटाळ यांनी आम्ही कसे घडलो यांवर विचार मांडले. प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपापल्या परीने आपले विचार मांडले आणि स्वतःची ओळख करून दिली.
या कार्यक्रमासाठी जे नऊ शिक्षक होते ते खरोखरच नवरत्न होते. या सर्वांनी आपले अनुभव मांडले. त्या सर्वांना हा कार्यक्रम खूप आवडला. तसेच चव्हाण मॅडम यांना याचा खूप आनंद झाला व अभिमान वाटला. कै. आर. डी. घार्गे सरांचे कार्य सुवर्णाक्षरात लिहावे असे आहे. चव्हाण सर,आणि आर. डी. घार्गे यांची उणीव प्रकर्षाने जाणवली.
वसंत अवघडे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी शुभेच्छा पाठविल्या होत्या, त्या भुजबळ यांनी वाचून दाखवल्या. या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा स्वाद प्रत्येकानी घेतला आणि सर्वांनी हा कार्यक्रम आठवणीत रहावा म्हणून फेटे बांधुन फोटो काढले. आणि गप्पा गोष्टी केल्या. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी आताचे मुख्याध्यापक जे. बी. घार्गे सर यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.
