* भाजप युवा मोर्चाचे डॉं. सतीश केळशीकर आक्रमक
ठाणे / अमित जाधव :- दिव्यात ऐन परीक्षेच्या काळात बत्तीगुल होत असल्याचे चित्र पहावयास येत असल्याने दिवा भाजप आक्रमक झाली आहे. १०/१२ वी परीक्षा सुरु झाल्याने त्यात टोरंटने सुरु केलेले लोडशेडींग तात्काळ बंद करण्याबाबत दिवा भाजप मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चाचे डॉं. सतीश केळशीकर यांनी टोरंट कार्यालयात विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
दि. १४ फेब्रुवारीपासून १२ वी परीक्षा सुरु झाली असून दि. २१ फेब्रुवारीपासून इ. १० वीची देखील परीक्षा सुरु होत असून गेल्या आठवड्याभरापासून दिवा शहरात टोरंटचे लोडशेडींग सुरु झाले असून या प्रकरणी शालेय विद्यार्थी तक्रार करू लागल्याने व दिव्यात ४/५ तासांसाठी विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. परिणामी परीक्षेच्या काळात सदरची लोड शेडींग तात्काळ बंद करावी अन्यथा दिवा भाजप मोर्चाच्या वतीने आंदोलन छेडावे लागेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी टोरंटची राहील याची दखल घ्यावी, असे भाजप ठाणे शहर जिल्हा मोर्चा सरचिटणीस डॉं. सतिश केळशीकर यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे तुषार गायकर व दत्ता कोलते उपस्थित होते.
