अंकुर सीड्सकडून बियाणे खरेदीत शेतकऱ्याची फसवणूक

* कृषी अधिकारी ही देईनात दाद  

वसई / प्रतिनिधी :- जलद व जास्त उत्पन्नाचे गाजर दाखवून हायब्रीड बियाणे कंपन्या शेतकऱ्याची फसवणूक करण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत चालली असल्याचे दिसून येत आहे. या कंपन्यांवर कारवाई करण्यास शासकीय कृषी अधिकारी असमर्थ ठरत असल्याने शेतकरी वर्ग कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. अश्याच प्रकारे फसगत भिवंडी तालुक्यातील  पायगाव येथील दशरथ मुकादम या शेतकऱ्याची झाली आहे.  

दशरथ तुकाराम मुकादम यांनी जून 2024 रोजी अंकुर सीड्स कंपनीचे बी भात लागवडीसाठी घेतले होते. मात्र, ते नित्कृष्ट दर्जाचे असल्याने पूर्ण वाढ होण्याआधीच मागे पुढे भाताची कणसे धरू लागली. याबाबत दशरथ मुकादम यांनी भिवंडी तालुका शेतकी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर काही दिवसांनी उपविभागीय अधिकारी नयन वाढ, तालुका कृषी अधिकारी शिंदे, कृषी पर्यवेक्षक किशोर गायकवाड, कृषी सहाय्यक भोईर मैडम, भिवंडी पंचायत समिती कृषी अधिकारी गवळी मैडम, अंकुर सीड्स कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासोबत मुकादम यांच्या शेतीवर पाहणी  करण्यासाठी आले. त्यांनी लागलेल्या भात कणसाची पाहणी करून त्यांच्यात चर्चा होऊन दशरथ मुकादम यांना फक्त  दहा हजार रुपये देण्याची तयारी दर्शवून प्रकरण मिटविण्यास सांगितले. 

मात्र, शेत नागरणी ट्रॅक्टर तसेच मजुरी मागे पन्नास हजारांपर्यंत खर्च झाल्याने मुकादम यांनी दहा हजार रुपये घेण्यास नकार दिला. त्यानंतर काही दिवसांत कृषी अधिकाऱ्यांनी अंकुर सीड्स कंपनीबरोबर हातमिळवणी करून उलट माझीच चुकी दाखविल्याचा आरोप मुकादम यांनी केला आहे. त्यामुळेच आपल्याला अजूनही कंपनीकडून भरपाई मिळाली नसल्याचेही मुकादम यांचे म्हणणे आहे. मुकादम यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांची बियाणे खरेदीत फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, कृषी अधिकारी व कंपनी यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण असल्याने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले  जात असल्यानेच कुणी तक्रार करण्यास पुढे येत नाही.  आपल्यासारखी इतर शेतकऱ्यांची बियाणे खरेदीत फसवणूक होऊ नये, यासाठी दशरथ मुकादम यांनी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या भेटी घेवून अंकुर कंपनीचे बियाणे घेऊ नका, असे आवाहन करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post