* स्वारगेट बलात्कार प्रकरण : नागरी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने खालापूर तहसिलदारांना निवेदन सादर
खालापूर / प्रतिनिधी :- पुण्यातील स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणात आरोपींना तातडीने फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
संस्थेच्या अध्यक्ष वर्षा मोरे यांच्या नेतृत्वाखाली सचिव शारदा दळवी, अनुराधा चौरे, वैशाली घाटकर, सोनम महाडिक आणि सुप्रिया देशमुख यांनी खालापूर तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी अभय चव्हाण यांना लिखित निवेदन सादर केले.
या निवेदनात महाराष्ट्रात महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, या गंभीर प्रकरणात आरोपींवर जलदगतीने न्यायालयीन प्रक्रिया राबवून कडक शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायनीतीच्या विचारांप्रमाणे महाराष्ट्रातील महिलांना सुरक्षिततेची हमी मिळाली पाहिजे. अशा अमानुष गुन्ह्यांवर कठोर शिक्षा न केल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, असे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तहसिलदार अभय चव्हाण यांनी या निवेदनाची दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.