खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यातील चांभार्ली गावातील रजत मुंढे याची आयएसपीएल प्रीमिअर लीगमध्ये मुंबई संघात निवड झाल्यानंतर 'त्या' निवडीचे रजत मुंढे याने सोने करून संपूर्ण देशभरात टेनिस क्रिकेट स्पर्धेत नावलौकिक केले आहे.
चांभार्ली गावचा सुपुत्र रजत मुंढे हा टेनिस क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. या टुर्नामेंट मध्ये 284 धावा बनवित आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या प्रदर्शनाने सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब मिळविला आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र रजत मुंढेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून चांभार्ली गावात आज ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत जेसीबीमधून फुलांची उधळण करीत जल्लोषात मिरवणूक काढून त्याचे स्वागत करण्यात आले. त्याचे आई-वडील यांनी भावूक होत आमच्या पोटी हिरा जन्माला आला आहे, असे उद्गार काढत आम्हाला सर्वत्र रजतचे मम्मी-पप्पा म्हणून ओळख मिळत आहे, असेही व्यक्त झाले. तसेच रजतच्या सर्व मित्रमंडळी गावातील सर्व लहानथोरांचेही यावेळी त्यांनी आभार मानले.