एमपीएससीच्या संथगतीच्या कारभारामुळे परीक्षार्थींमध्ये तणावाची लाट

* क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांना निवेदन

पुणे / प्रतिनिधी :- एमपीएससी (MPSC) क्लर्क 2023 च्या निकालासंदर्भात क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. त्यांनी पूर्ण विषय ऐकून मुख्यमंत्री महोदयांबरोबर या संदर्भात पाठपुरावा करतो, असे आश्वासन दिले.

यासंबंधी सविस्तर माहिती अशी की, एमपीएससी (MPSC) च्या संथ गतीच्या कारभारामुळे होतकरू परीक्षार्थ्यांमध्ये तणावाची लाट निर्माण झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट क भरती प्रक्रिया  संथगतीने होत असल्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल 15 हजाराहून अधिक उमेदवार या प्रक्रियेमध्ये अडकले असून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांचे भविष्य अधांतरी आहे. आयोगाने वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी विद्यार्थ्यांची शासनाकडे मागणी आहे.

जानेवारी २०२३ मध्ये या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर पूर्व परीक्षा ३० एप्रिल २०२३ रोजी, मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०२३ रोजी, तर कौशल्य चाचणी ४ जुलै ते १३ जुलै २०२४ दरम्यान पार पडली. कौशल्य चाचणीचा निकाल ३० सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर झाला. मात्र, अतिशय संथगतीच्या कारभारामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास विलंब झाला आहे. सध्या लिपिक टंकलेखकांच्या ७ हजार पदांसह ४०० हून अधिक कर सहाय्यक पदाची भरती प्रक्रिया रखडलेली आहे. निवड प्रक्रिया रखडल्यामुळे परीक्षार्थी व त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक ताण निर्माण झाला आहे.

* विद्यार्थ्यांची मागणी :- 

- न्यायालयीन प्रक्रियेस गती देण्यासाठी ठोस पावले उचलावीत.

- संबंधित प्रशासकीय विभागांशी समन्वय साधून लवकरात लवकर अंतिम निकाल जाहीर करावा.


या संदर्भात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना तसेच इतर मंत्री, आमदार यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली असून त्वरीत कार्रवाई होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post