खालापूरच्या डोंगरावर पेटला वणवा

* झाडेझुडपे जळून खाक...पेटविले कुणी ? 

खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यातील जुन्या मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गांलगत नवीन सुरु असलेल्या सीएनजी गॅस पंपासमोरील असणाऱ्या डोंगरावर शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास वणव्याने पेट घेतला. थोड्याच वेळात पाहता - पाहता काही क्षणातच वणवा झपाट्याने पसरत गेल्याने आगीने भीषण रुप धारण केले. आगीचे भीषण रुप पाहिल्यावर अंगावर थरकाप येत पायाखालची जमीन सरकून जाते अशी आगीने रूप धारण केल्याचे दिसून येत होते. या आगीत डोंगरावरील झाडे, रानटी झुडपे, औषधी वन संपत्ती बरोबरच इतर महत्त्वाच्या वनस्पती, सूक्ष्म जीव आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. वनव्यामुळे निसर्गरम्य डोंगरावर काळी चादर पसरून आता डोंगर काळेकुट्ट दिसणार अशी खंत व्यक्त होत आहे. या वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा खाक झाली असून वन्यप्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाल्याचे समजते. संपूर्ण डोंगर दूरपर्यंत जळतांना दिसून येत होता. तसेच ह्या डोंगराला आग लागली की, लावण्यात आली याचा शोध वन विभागाने घेवून आग लावणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

या डोंगरालगत काही खासगी मालकाने गेल्या काही दिवसांपासून पोकलन, जेसीबी मशीनद्वारे डोंगर पोखरण्याचे काम मोठ्या जोमाने सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच डोंगरकड्याचे नैसर्गिक नाले देखील बुजविले जात असल्याची चर्चा सुरू आहे. हे डोंगर पोखरण्यासाठी व नैसर्गिक नाले बुजविण्यासाठी कोणतेच नियम नाही का ? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

दरवर्षी हिवाळ्यात आग लागण्याच्या घटना समोर येत असतात. वणव्यापासून जंगल वाचवा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून वन्यप्रेमी, पर्यावरणवादी आणि प्रसारमाध्यमे शासनाच्या कानीकपाळी ओरडून सांगत असले तरी शासनाला त्याचे गांभीर्य समजत नाही असेच दिसून येते. दरवर्षी वणव्यामुळे जंगलांचे प्रचंड नुकसान होते. दरवर्षी वणवे लागतात की, लावले जातात हा संशोधनाचा विषय आहे. परंतु खुप काही जैवविविधता यापासून नष्ट होत आहेत हे मात्र खरे आहे. या आगीमध्ये पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी, झाडे-झुडपे, औषधी वनस्पती अशी वन्य संपदा व जैव विविधता नष्ट होत असते. खालापूर तालुक्याला निसर्ग संपदा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. पावसाळ्यात हिरव्यागार डोंगरदऱ्या नटलेला हा परिसर पर्यटकांना नेहमीच आपल्याकडे आकर्षित करीत असतो. मात्र, जानेवरी-फेब्रुवारी महिना आला की, तालुक्यातील डोंगरांवर अनेक ठिकाणी वणवे लागण्याचे प्रकार घडतांना दिसून येतात. यात वनसंपदेची हानी खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी वनविभागाने कारणे न देता ठोस पाऊले उचलावीत व वणवे लागू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

डोंगरावर अचानक आग लागली. डोंगरावर असणारे वाळलेले गवत आणि वाहणारा वारा यामुळे पाहता पाहता आग चांगलीच पसरली. रस्त्यावरूनही हा वणवा दिसत होता. रात्रीच्या अंधारात दुरवरून पाहतांना हा पेटलेला डोंगर चांगला वाटत असला तरी त्यामुळे डोंगरावरील झाडाझुडपांची तसेच सरपटणार्‍या अन्य लहान प्राण्यांची होणारी होरपळ पर्यावरण प्रेमींना अस्वस्थ करून जात होती. तालुक्यात वणवा लागण्याची वेगवेगळी कारणे सांगितली जातात. मोठी झाडे पडतांना होणारे घर्षण, आकाशातून कोसळणारी वीज, अति उष्णतेमुळे कोरडे गवत अथवा पाने पेटणे, गवत किंवा पाने कुजतांना होणार्‍या प्रक्रियेमुळे मिथेनसारखा ज्वलनशील वायू तयार झाल्यामुळे जंगलात आग लागू शकते. घनदाट जंगलात झाडाच्या फांद्या एकमेकांवर घासल्या गेल्यामुळेही ठिणग्या पडून वणवा लागत असल्याचे सांगितले जाते. पण नक्की वणवे कोण आणि का पेटवून देतो ? वणवे लावणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निसर्गप्रेमींकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post