अनधिकृत फेरीवाले हटविण्याची युवासेनेची मागणी

* कल्याण-शिळ रोडवरील वाहतूक बंद असताना पर्यायी रस्ता म्हणून दिवा शहरात वाहतूक कोंडीची शक्यता

ठाणे / अमित जाधव :-  वाहतूक विभाग अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ००.०१ ते १० फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत कल्याण-शिळ रोडवरील ये-जा करणारी वाहतूक मुख्य रस्त्यावरून बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. या कालावधीत हलकी वाहने दिवा शहरातून वळविण्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

यामुळे या कालावधीदरम्यान कल्याण-डोंबिवलीमधील चाकरमानी तसेच रहिवाशी हे दिवा शहरातून मार्गस्थ होऊन त्यांच्या इच्छितस्थळी जाणार असून या कालावधीमध्ये दिवा शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच दिवा शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत फेरीवाले उभे असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे दिवा शहरातील वाहतूक सुरळीत राहण्याकरीता रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले हटविण्याची त्याचबरोबर वाहतूक पोलिसांची क्षमता वाढविण्याची मागणी युवासेनेचे अभिषेक ठाकूर यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post