* तत्काळ स्थगितीची मागणी
अकोट / मोहम्मद जुनेद :- अकोट व तेल्हारा तालुक्यात महावितरण कंपनीतर्फे प्रस्तावित प्रिपेड स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. ग्राहकांना कोणतेही स्वातंत्र्य न देता सक्तीने हे मीटर बसविण्याचा प्रयत्न सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक शोषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महावितरणच्या या सक्तीविरुद्ध काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, वीज कायदा २००३ च्या कलम ५५ नुसार ग्राहकांना मीटर निवडीचे स्वातंत्र्य आहे, मात्र महावितरणकडून बळजबरी केली जात आहे. स्मार्ट मीटर बसविल्यास ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागेल. वीज बिल अधिक वेळेपर्यंत थकविल्यास थेट वीजपुरवठा बंद करण्याची सुविधा यामध्ये आहे, त्यामुळे ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर, विजेच्या दरांमध्ये वाढ होऊन सामान्य जनतेवर अतिरिक्त आर्थिक ताण येईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
तसेच या नव्या योजनेमुळे मोठ्या संख्येने मीटर रीडिंग घेणारे कर्मचारी बेरोजगार होतील. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. जर हे स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यात आले, तर अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. सदर प्रकल्प तात्काळ स्थगित करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष महेश गणगणे यांनी केली आहे. अन्यथा, काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष आपल्या लढ्याला तयार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच, शेतकऱ्यांसाठी नवीन वीज कनेक्शन देण्यास महावितरणकडून बंदी घालण्यात आली आहे. ऑफिसमध्ये विचारणा केल्यास, फक्त सौर ऊर्जेच्या (सोलर) कनेक्शनसाठीच परवानगी दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही असंतोष वाढत असून, यामुळे शेतीसाठी आवश्यक वीजपुरवठ्यावर मर्यादा येणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षाने या अन्यायकारक धोरणावरही आक्षेप घेतला असून, शेतकऱ्यांसाठी नियमित वीज कनेक्शन सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
महावितरणने नागरिकांच्या भावना लक्षात घेत योग्य निर्णय घ्यावा आणि सक्तीच्या धोरणावर पुनर्विचार करावा, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदन हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष महेश गणगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. यावेळी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनोख राहणे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सारंग मालानी, माजी नगरसेवक सतीश हाडोळे, माजी नगरसेवक संजय आठवले, अतुल खोटरे, कपिल रावदेव, गजानन डाफे, डॉं. शाम नेमाडे, अझहर शेख, आसिफ भाई, हरिभाऊ मानकर, अरुण अंबाळकर, संतोष नाथे, मुबारक भाई, कालुभाई मेंबर, सुनील गेबड, मयुर निमकर, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद नितोने, वासुदेव घाटोळ, केशव हेंड, विशाल राठोड, अभय तेलगोटे, सोमनाथ हिंगे, करण तेलगोटे, आकाश तेलगोटे, मयूर तेलगोटे, अनिकेत फुलारी, निखिल झाडे, शिरीष घाटोळ, रितेश हाडोळे, आशिष चिखले, चेतन वारे, पंकज हाडोळे, आदींची उपस्थिती होती.
महावितरणने तातडीने निर्णय घेऊन स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्याचा आणि शेतकऱ्यांसाठी नवीन वीज कनेक्शन देण्यास घातलेल्या निर्बंधाचा पुनर्विचार करावा, अन्यथा काँग्रेस पक्ष संघर्षाची भूमिका घेत रस्त्यावर उतरेल, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
