खोपोली / मानसी कांबळे :- दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित बचत गटांची उत्पादने विक्री करणे तसेच महिलांच्या कलागुणांना वाव देवून त्यांची नोंदणी करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व विभाग प्रमुख श्वेता बाराथे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपजीविका केंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे. या शहर उपजीविका केंद्राचे नुकतेच उद्घाटन कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.
खोपोली शहरातील महिलांनी उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध झालीच पाहिजे, यासाठी येणाऱ्या अधिवेशनात याबाबत मुद्दा उपस्थित करून त्यांना काम मिळवून देण्याचे विधेयक अधिवेशनात मांडणार असल्याचे आ. थोरवे यांनी सांगितले. तसेच शासनातर्फे जेवढ्या योजना येतात, त्या सर्वांचा लाभ महिलांना मिळवून द्यावा. याबाबत अंमलबजावणी करावी व शहरातील महिलांना याच इमारतीत विविध प्रशिक्षण आयोजित करून त्यांना कसे सक्षम करता येईल यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
खोपोली नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी रणजीत पवार, एनयुएलएम विभाग प्रमुख श्वेता बाराथे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एनयुएलएमचे शहर अभियान व्यवस्थापक पंकज खोत, समुदाय संघटक सविता जाधव, समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) तसेच शहरातील शहर स्तर संघ, वस्ती स्तर संघ प्रतिनिधी व सर्व बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची प्रस्तावना शहर वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा जयश्री मिंडे यांनी तर सूत्रसंचालन शशिकांत सुर्वे यांनी केले.
