इंदापूर / प्रतिनिधी :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमसाखर गावात तीन दिवसीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती निमसाखर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हिप्नॉटिझम कार्यक्रम, पारंपारिक मिरवणूक व स्नेहभोजन आदी उपक्रमांचा समावेश असून गावात विविध क्षेत्रातील भरीव योगदान असणाऱ्या विद्यार्थी व अधिकारी यांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे.
१७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन गावातील ऐतिहासिक राजवाड्यातील मैदानावर सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पार पडणार असून उद्घाटनासाठी अकलूजचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉं. एम. के. इनामदार, वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, मंडल अधिकारी सतिश गायकवाड यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी गणेश लंबाते, ग्राम महसूल अधिकारी अनिल जगताप, पोलिस उपनिरीक्षक मिलिंद मिठापल्ली, पशुधन पर्यवेक्षक अमोल क्षीरसागर आदी उपस्थित राहणार आहेत.
उत्सव सोहळ्याचे यंदाचे १४ वे वर्ष आहे. गावातील नामांकित मंडळींनी आपल्यावतीने विविध सामाजिक व आर्थिक जबाबदाऱ्या विभागून घेतल्याने सोहळ्याची व्याप्ती वाढली आहे. या शिवजयंती उत्सव सोहळ्यात गावातील सर्व जातीधर्मातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. आत्तापासूनच गावाच्या मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर लागले असून गावात भगवेमय वातावरण होत आहे. निमसाखरमधील शिवजयंती ही तालुक्यातील सर्वात उत्साही शिवजयंती म्हणून ओळखली जाते.
