* नगर अभियंता अनिल वाणी, अभियंता सतीश हडप यांचाही सन्मान
खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद हद्दीत असलेल्या विविध धार्मिक स्थळांची साफसफाई तसेच दुरूस्ती केल्याबद्दल खोपोली नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील, नगर अभियंता अनिल वाणी, अभियंता सतीश हडप यांचा नुकताच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा कोकण प्रदेश अध्यक्ष सुधीर गोविंद माने यांच्या हस्ते शाल व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या खोपोली नगर परिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. स्वच्छतेविषयी देखील पुढाकार घेत धार्मिक स्थळांची प्राधान्य क्रमाने स्वच्छता करण्यात येत आहे. हाळ येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे वाढली होती तसेच शेड देखील मोडकळीस आले होते. संरक्षण भिंत पडल्याने मोकाट जनावरे कब्रस्तानमध्ये शिरत होती. याप्रकरणी आम आदमी पार्टीसह ग्रामस्थ व पत्रकारांनी मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांच्याकडे समस्या मांडली होती. त्याची तत्काळ दखल घेत मुख्याधिकारी यांनी काम मार्गी लावले. ऐवढेच नव्हे तर खोपोली शहरातील गणेश विसर्जन घाट, स्मशानभूमीची देखील साफसफाई व दुरूस्ती करण्यात आली होती. यासाठी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा कोकण प्रदेश अध्यक्ष सुधीर गोविंद माने यांच्या हस्ते मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील, नगर अभियंता अनिल वाणी, अभियंता सतीश हडप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, महिला महासचिव मानसी गणेश कांबळे आदी उपस्थित होते.

