छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवरून कर्मभूमीत बहाद्दर मावळ्यांनी विक्रमी वेळात आणली शिवज्योत

खोपोली / प्रतिनिधी :- 14 फेब्रुवारी 2025 व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे रंग उधळले जात असताना खोपोलीतील इतिहास अभ्यासक तथा वेध सह्याद्रीचे संस्थापक अध्यक्ष आकाश घर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली काही युवक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीची भव्य प्रतिकृती निर्माण करण्यात दंग होते. त्या निर्मितीमध्ये आपलाही खारीचा वाटा देण्यासाठी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि अमोल ठकेकर त्या ठिकाणी गेले होते. वेळ रात्रीची होती किल्ले शिवनेरीची प्रतिकृती अंतिम टप्प्यात होती आणि त्या किल्ल्यावरील वास्तु निर्माणाचे काम सुरू असताना आकाश घर्डे यांनी गुरुनाथ साठेलकर यांना जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर जर आपण गेलो आणि त्या पुण्य शिवजन्मभूमीवर मशाल प्रज्वलित करून खोपोली शहरात आणली तर एक वेगळा इतिहास निर्माण होईल असा त्यांचा मनोदय सांगितला. शिवजयंतीला तर अवघे चारच दिवस उरले होते, तरी देखील क्षणाचाही विलंब न लावता त्याचवेळी ठरले की शिवज्योत दौडत आणायचीच.      

खोपोलीपासून किल्ले शिवनेरी हा साधारणत: 150 किलोमीटर अंतराचा टप्पा होता. दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्याने धावपटू सहज उपलब्ध होणे शक्य नव्हते. तरीही हेल्प फाउंडेशनच्या महेश भोसले आणि अमित विचारे यांनी जणू "शिवज्योत दौड" पूर्ण करण्याचा विडा उचलला. वेध सह्याद्रीचे शिलेदार देखील उत्साहाने या दौडमध्ये सहभागी होण्यासाठी तयार झाले आणि कुस्ती महर्षी कै. भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाच्या पैलवानांनी देखील साथ देण्याचे ठरवले. 

15 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळपासून खरे नियोजन सुरू झाले. 17 तारखेच्या रात्री किल्ले शिवनेरीवर दाखल व्हायचे आणि 18 तारखेच्या पहाटे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थानावरून शिवज्योत प्रज्वलित करून जुन्नर - राजगुरूनगर - तळेगाव - लोणावळा मार्गे खंडाळा घाटातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्मभूमीवर अर्थात रायगड जिल्ह्यातील खोपोलीपर्यंत दौडत आणून ती रातोरात शीळफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवात मानाने आयोजकांच्या हाती सुपूर्द करायची असे ठरले. 

"शिवज्योत दौड"साठी आवश्यक असलेल्या संसाधनांची आणि वाहनांची जमवाजमव सुरू झाली. अमित विचारे आणि महेश भोसले यांनी क्रीडा क्षेत्रातील कसलेल्या धावपटूंशी संपर्क केला असता प्रत्येकाने आपल्या नियोजित कामांना बगल देऊन या उपक्रमात सहभागी होण्यास होकार दिला. विजय भोसले यांनी नियोजनात वाहने आणि सामुग्रीची जबाबदारी स्वीकारली. एवढ्या लांबून शिवजोत आणण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आणि अनुमोदनासाठी खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, खालापूर तालुका उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील आणि खोपोली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही त्यासाठी तत्काळ परवानगी दिली. 

17 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता शिळफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर सर्वजण एकत्र आले, शिस्तीत शिवज्योत सन्मानाने घेऊन येण्याची शपथ त्या ठिकाणी आकाश घर्डे यांनी सर्वांना घ्यायला लावली. शिवज्योत दौड सुरक्षित आणि यशस्वी व्हावी यासाठी छत्रपतींचे आशीर्वाद घेऊन सर्वजण वाहनांनी जुन्नरच्या दिशेने निघाले. 

18 फेब्रुवारी पहाटेची वेळ होती. अंगाला झोंबणारा कडाक्याचा गारठा होता मात्र शिवप्रेमींच्या मनामध्ये असलेली जिद्द गारठ्याची तमा करत नव्हती. अवघ्या सहा वर्षाची सावी अमित विचारे, साठीकडे झुकलेले महेश भोसले  आणि मधल्या वयोगटातील सर्व धावपटू छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीवर दाखल झाले. पहाटे 5 वाजता सावी अमित विचारे आणि वीर विजय भोसले यांच्या हातात सन्मानाने शिवज्योत सोपवली गेली,  त्यावेळी गगनभेदी घोषणा दिल्या गेल्या. जल्लोष झाला आणि ती प्राणप्रिय शिवज्योत किल्ले शिवनेरी येथून खोपोलीसाठी पायउतार झाली. वेध सह्याद्री, हेल्प फाऊंडेशन, कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल या संस्था त्याचसोबत अमित विचारे आणि महेश भोसले या क्रीडा प्रशिक्षकांचे धावपटू संयुक्तपणे एकदिलाने शिवज्योत घेऊन समर्थपणे मार्गक्रमण करण्यासाठी दौडत निघाले. 

किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी सर्वांची वाहने उभी होती,  त्या वाहनांचा ताफा आता या आयोजनात सहभागी होणार होता. योद्धा व्हॅन सुरूवातीला नंतर दोन बुलेट मोटारसायकलच्या मध्ये शिवज्योत घेऊन दौडणारा धावपटू, त्याच्या मागोमाग इतर सर्व वाहने आणि त्या वाहनांमध्ये शिवज्योत दौडमधले सर्व धावपटू शिस्तबद्दरित्या समावले होते. सर्व वाहनांवर हिंदवी स्वराज्याचा सन्मान असलेला भगवा झेंडा मानाने फडकत होता.

मजल दरमजल करत शिवज्योत दौड मार्गस्थ होत होती. वेळ सकाळची असल्याने कोवळ्या उन्हात धावपटू ताशी 20 किलोमीटर वेगाने धावत होते. जुन्नर येथे नाष्टा करण्यासाठी ब्रेक घेतला गेला. त्या वेळी पुनश्च एकदा पुढचे अंतर कशा पद्धतीने पार पाडायचे याचे प्लॅनिंग केले गेले. जुन्नर ते राजगुरुनगर हे अंतर अपेक्षेपलीकडच्या कमी वेळात गाठले गेले. राजगुरुनगर टोल नाक्यावर तेथील शिवप्रेमींकडून शिवज्योतीचे जंगी स्वागत आणि आदरातिथ्य झाले. नियोजित वेळेपूर्वी सर्वजण तेथे दाखल झाले होते, त्याकारणे भोजन व्यवस्था करणाऱ्यांची तारांबळ उडाली होती.

भोजनानंतर काहीवेळ विश्रांती घेऊन भर उन्हात पुन:श्च एका नव्या जोशाने शिवज्योत दौड ठिकठिकाणी स्वागताचा स्विकार करत मार्गक्रमण करत होती. त्याच दरम्यान खोपोलीमधून उशिरा आलेले अनेक शिवप्रेमी या जल्लोषात सहभागी होत गेले. नवलाख उंबरे, तळेगाव एमआयडीसी, वडगाव, कामशेत येथील शिवप्रेमींच्या स्वागताने धावपटूंना वेगळी ऊर्जा मिळत होती. लोणावळा ते खोपोली या अंतिम आणि अवघड टप्प्यात शिवज्योत दौडमध्ये नव्या उमेदीने सहभागी झालेल्या महिला कुस्तीपटूंनी खंडाळा घाट सहज पार केला. टाटा सायमाळ येथे स्वागताचा स्विकार करून शिवज्योत दौड खोपोली शहराच्या स्वागत कमानी जवळ येताच सर्वांच्या आनंदाला जणू उधाण आले. संपूर्ण खोपोली शहरात शिवज्योत दौड भ्रमण करणार असल्याने नवा जोश सर्वांच्या अंगात संचारला होता. वरची खोपोली येथील शिवस्मारका जवळचे स्वागत स्विकारून लक्ष्मीनगर, मोगलवाडी, काटरंग, वीणानगर, शास्त्रीनगर, बाजारपेठ, वासरंग, लौजी येथून चिंचवली येथे सर्वजण दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. औक्षण केले, मिठाई वाटली आणि आनंदोत्सव साजरा केला. तेथून भरधाव वेगाने शिवज्योत दौड खोपोली शिळफाट्यावरील शिवस्मारकाकडे निघाली. इंदिरा गांधी चौकात या आयोजनात सहभागी झालेले सर्वचजण एकत्र आले आणि भगव्या झेंड्याच्या साक्षीने शिवज्योत  शिवस्मारकासमोर दाखल झाली. खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांनी आणि आयोजकांनी ज्योतीचा स्विकार करून तिला मानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केले. या अभूतपूर्व क्षणासाठी अवघ्या काही तासांत अथक परिश्रम घेऊन शिवज्योत दौडमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना कृतार्थ झाल्यासारखे वाटले. 

खोपोलीच्या इतिहासात या शिवज्योत दौडची सन्मानाने नोंद होईल हाच विश्वास सर्वांच्या मनात होता. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला जर आलो असतो तर छत्रपतींचा कोणताही आदेश शिरसावंद्य मानून कोणत्याही मोहिमेत प्राणांची बाजी लावली असती असा विश्वास प्रत्येकाच्या मनात दृढ होत होता. आपली कणभर सेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करून शिवज्योत दौडमध्ये सहभागी झालेले सर्वजण समाधानाने भविष्यात पुनश्च नवा संकल्प करण्याच्या निश्चयाने महाराजांना मानाचा मुजरा करून माघारी परतले. 

* आठवणीतले क्षण :- 

- शिवज्योत दौड अभियानाचा आरंभ करताना ज्या ठिकाणी मोजकेच शिवप्रेमी उपस्थित होते, त्याच ठिकाणी शिवज्योतीचे आगमन झाल्यावर हजारों शिवप्रेमींनी गर्दी केली होती. 

- श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावर शिवज्योत प्रज्वलित केल्यानंतर त्यातून प्रकट झालेला त्रिशूल शिवतेजाचे स्मरण करून देत होता. 

- किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावरून बाल शिवबाच्या सवंगड्यांच्या वयोगटातील कु. सावी, कु. वीर, कु. पूर्वा आणि इतर जणांचा जोश पाहता शिवकाळात अशीच उमेद मनाशी बाळगलेले मावळे इतिहास घडवून गेल्याचे स्मरण झाले. 

- शिवज्योत दौड सुरू झाल्यानंतर किल्ले शिवनेरीवरून खाली उतरत असताना सोसाट्याच्या वाऱ्याने मशालीतील जळता बोळा अवघ्या सहा वर्षाच्या कु. सावीच्या दंडावर पडला आणि हाताचा तो भाग अक्षरशः पोळून निघाला. आरंभाला अपशकुन झाला की काय ? अशी खंत वाटत असतानाच 'मला काहीच नाही झाले' असं सांगत त्याच पोळलेल्या हाताने शिवज्योत घेऊन दौडणाऱ्या चिमुकल्या सावीकडे पाहिले असता तिच्यात हिरकणी संचारल्याचा भास झाला. तीच कु. सावी किल्ले शिवनेरी ते खोपोलीच्या शिवस्मारकापर्यंत आपल्याला झालेल्या जखमेचे शल्य विसरून त्याच जोशात टप्प्याटप्प्याने दौडत होती हे विशेष.

- आपल्याच हातून जास्तीत जास्त अंतर पार झाले पाहिजे असा निग्रह करून प्रत्येक धावपटू दुसऱ्याच्या हातातील शिवज्योत आपल्या हातात कशी येईल यासाठी जणू जीवाचा अट्टाहास करत होता. एक मात्र खरे की, कोणाच्याही उत्साहाला क्षणभरही थकव्याचा स्पर्श झाला नव्हता. 

- या शिवज्योत दौड आयोजनात काही संस्था आणि अनेक धावपटूंचा सहभाग जरी असला तरी त्या सर्वांना मात्र शिवप्रेमाच्या सूत्रांने बंधित केले होते याचा क्षणाक्षणाला दाखला मिळत होता.


Post a Comment

Previous Post Next Post