पाचोरा / प्रतिनिधी :- पंढरपूर येथे ८ व ९ फेब्रुवारी रोजी अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला संघ व सोलापूर जिल्हा शैक्षणिक कलाशिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कलाशिक्षण परिषदेचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच पार पडले.
या राज्यस्तरीय कला शिक्षक संमेलनात पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे कलाशिक्षक तसेच सुप्रसिध्द रांगोळीकार शैलेश कुलकर्णी यांनी रांगोळीमधून व्यक्तिचित्र कसे साकारावे याचे प्रात्यक्षिक दिले. या प्रात्यक्षिकात त्यांनी रांगोळीमधून पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे हुबेहूब व्यक्तिचित्र सादर केले. यास राज्यभरातून जमलेल्या कलाशिक्षकांनी तसेच कला रसिकांनी भरभरून दाद दिली. या संमेलनात माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, प्रदर्शन सरचिटणीस शालिग्राम भिरूड, कला संचानालयाचे परीक्षा नियंत्रक नागेश वाघमोडे तसेच अनेक दिग्गज कलावंत, सेवानिवृत्त कलाशिक्षक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
