लाचखोर मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांना अटक

* 15 हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

कर्जत / प्रतिनिधी :- 15 हजाराची लाच घेताना नेरळ मंडळ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. संदीप भंडारे असे या मंडळ अधिकाऱ्याचे नाव असून तो डोंबिवली येथील राहणारा आहे. तक्रारदार यांच्या जागेची नोंद करून घेण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी 15 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. अखेर आज लाच घेताना मंडळ अधिकारी भंडारे हा नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यात जाळ्यात अडकला.

तक्रारदार यांची नेरळ परिसरातील मौजे जिते या गावातील सर्व्हे नंबर 91/17, 91/18, 19/1, 19/16 जागेची खरेदीखतानुसार सात-बारा सदरी नोंद करण्यासाठी नेरळ तलाठी कार्यालयाकडे प्रकरण दाखल करण्यात आले होते. तर तलाठी सजा नेरळ यांनी फेरफार दफ्तरी सदर जमिन मिळकतीच्या खरेदी खतानुसार नोंद करीत त्यांचे काम करून अंतिम नोंद मंजुरीकरीता वरिष्ठ अधिकारी म्हणून नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांच्याकडे वर्ग केली होती. परंतु सदर जमिन मिळकती फेरफार दफ्तरी अंतिम नोंद करण्यासाठी नेरळ मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी तक्रारदार यांच्याकडे एकूण तीन नोंदीचे प्रत्येकी 15 हजार रूपये प्रमाणे एकूण 45 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती.

गेले सहा महिन्यापासून जमिन मिळकतीच्या नोंदीचे काम प्रलंबित असल्याने व मंडळ अधिकारी संदीप भंडारे हे पैशाची मागणी करीत असल्याने तक्रारदार यांनी नाईलाजास्तव सदर प्रकरणी लाचलुचपत विभाग नवी मुंबई विभागाकडे तक्रार केली होती. 11 फेब्रुवारी 2025 रोजी लाचलुचपत विभाग नवी मुंबई विभागाकडून नेरळ तलाठी सजा कार्यालय येथे सायंकाळी साधारण 5 ते 5.15 वाजेच्या सुमारास सापळा रचत मंडळ अधिकारी संदीप भंडारे याला तक्रारदाराकडून 15 हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. 

ही कारवाई ही नवी मुंबई लाचलुचपत विभागाचे डिवायएसपी नितिन दळवी, पोलिस निरीक्षक अरुंधती येळवे, पोलिस निरीक्षक संतोष पाटील, एएसआय प्रदिप जाधव, हवालदार नाईक, गायकवाड, अहिरे, प्रमिला विश्वासराव यांच्यास्तरावरून करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post