खालापूर / प्रतिनिधी :- 16 जानेवारी, गुरुवार रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनवे निंबोडे येथे हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला खालापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे, मा. नगरसेविका संध्या मगर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पारठे, अंजना पवार, ललिता माने ,शाळेचे मुख्याध्यापक मारुती दासरे, शाळेच्या उपशिक्षिका पल्लवी चौलकर, शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या मनीषा मगर काकी, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, वनवे व निंबोडे दोन्ही गावातील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या.
प्रथम प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा रोशना मोडवे यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन माजी नगरसेविका संध्या मगर यांनी केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पारठे यांनी श्रीफळ वाढविले. शाळेतील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीताचे सुंदर गायन केले.
शाळेकडून मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रथमत: मातेकडे हळदी कुंकवाचे वाण ठेवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दोन्ही गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमामध्ये हळदी-कुंकू घेण्यासाठी आल्या. या कार्यक्रमासाठी खालापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा रोशना मोडवे यांनी दोन ताडपत्री शाळेला भेट दिल्या. खालापूर नगर पंचायत समितीचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश पारठे यांनी कार्यक्रमासाठी केळी पुरवली. शाळेतील शिक्षक व दोन्ही गावातील महिला पालकांनी वर्गणी जमा करून सर्व कार्यक्रमासाठी आवश्यक वस्तू आणल्या.
कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी सानिका पारठे, कोमल पारठे, सायली गोरे यांनी छान पैठणी साडीची रांगोळी काढली. नितीन घोलप यांनी खुर्च्या व ग्रीन मॅट देऊन शाळेची शोभा वाढविली. दोन्ही गावातील महिला भगिनी नटूनथटून आल्यावर रंगीबेरंगी कार्यक्रम सुंदर छानसा दिसत होता. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्षा हर्षाली उतेकर, सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व सर्व महिला पालक वर्ग यांच्या सहकाऱ्यांने हळदी कुंकू कार्यक्रम आनंदी वातावरणामध्ये अविस्मरणीय साजरा झाला. तरी सर्व मान्यवरांचे शालेय व्यवस्थापन समिती, दोन्ही गावातील महिला भगिनींचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.