* १५ दिवसांत कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा
खोपोली / प्रतिनिधी :- शिळफाटा खोपोली येथील दीपज्योत इमारतीसमोरील अनधिकृत पत्र्याच्या शेडबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी दाखल करूनही खोपोली नगर परिषद प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे स्थानिक नागरिक आणि तक्रारदार पत्रकार शिवाजी जाधव प्रचंड संतापले असून, त्यांनी याप्रकरणी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नगर परिषदेने तोंड देखले आश्वासन देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असे शिवाजी जाधव यांनी सांगितले. त्यांच्या मते, प्रशासन अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे, ज्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुविधांवर परिणाम होत आहे.
सदरच्या अतिक्रमणामुळे गटारांची तोंडे झाकली गेली आहेत, ज्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यांवरही अडथळे निर्माण झाले आहेत. नगर परिषद केवळ नोटीसा पाठवून मोकळे होते, पण प्रत्यक्ष कारवाईचा अभाव आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. यापुढे 15 दिवसांत कारवाई झाली नाही, तर मी प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे. खोपोली नगर परिषदेत भ्रष्टाचाराची पाळेमुळे घट्ट झाली आहेत, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
खोपोली नगर परिषदेने या प्रकरणी कोणतेही ठोस उत्तर दिलेले नाही. आम्ही प्रक्रियेनुसार कारवाई करू, एवढेच उत्तर प्रशासनाकडून मिळाले आहे. मात्र, कारवाईची प्रक्रिया एवढी धीमी का आहे, याचा कोणताही खुलासा अद्याप प्रशासनाने केलेला नाही. या प्रकरणात खोपोलीतील लोकप्रतिनिधीही गप्प आहेत. सामान्य जनतेने आता प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे की, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे केवळ शक्तिशाली व्यक्तींना झुकत आहेत का? या प्रकरणामुळे खोपोलीत सामाजिक वातावरण तापले आहे. तक्रारदारांनी पाठिंबा मिळविण्यासाठी विविध सामाजिक संघटनांशी संपर्क साधला आहे. शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांचा आंदोलनाचा पवित्रा तीव्र होण्याची शक्यता आहे.
सामान्य खोपोलीकरांच्या मागणीप्रमाणे प्रशासनाने लवकरात लवकर अतिक्रमण हटवावे आणि सामान्य जनतेला न्याय द्यावा. अन्यथा मोठ्या आंदोलनाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.