* तरूणाईने सादर केली एकापेक्षा एक कला
* खोपोली युथ फेस्टिवल उत्साहात संपन्न
* खोपोलीकरांनी लुटली सांस्कृतिक मेजवानी
खोपोली / मानसी कांबळे :- हेल्पिंग हॅन्ड क्लब आणि आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय नगरसेवक अमोल जाधव यांच्या स्मरणार्थ खोपोली युथ फेस्टिवल 2025 चे आयोजन करण्यात आले होते. युथ फेस्टिवल खोपोलीकरांसाठी एक मेजवानीच असते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या फेस्टिवलचा खोपोलीकरांनी मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कर्जत खालापुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे स्वागत फटाक्याच्या आतिषबाजीत करण्यात आले. खोपोलीतील स्थानिक युवा वर्गांला व त्यांच्या कलागुणांना हक्काचा मंच मिळावा यासाठी 2004 पासून अविरत खोपोली युथ फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते, असे कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक मुकेश रुपवते यांनी सांगितले. सर्वप्रथम गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा त्यानंतर फॅशन शो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आयोजकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. आमदार थोरवे यांनी कार्यक्रमातील सहभागी स्पर्धकांचे तसेच आयोजकांचे भरभरून कौतुक केले. तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात अग्रेसर असणा-या खोपोलीकरांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
खोपोली युथ फेस्टिवल 2025 मध्ये 200 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. हजारो प्रेक्षक कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित होते. स्पर्धकांमध्ये झालेल्या गायन, नृत्य स्पर्धेमध्ये प्रमुख तीन पारितोषिक देण्यात आले. फॅशन शोमध्ये प्रमुख तीन स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. फॅशन शोचे प्रमुख आकर्षण म्हणजे स्पर्धकांनी जंगल थीम परिधान केली होती. त्यांनी प्राण्यांच्या वेशभुषा परिधान करीत रॅम्प वॉक केला. यामध्ये मिस खोपोली, मिस्टर खोपोली, बेस्ट स्माईल, बेस्ट पर्सनॅलिटी, बेस्ट हेअर, बेस्ट ऍटिट्युड असे विविध पारितोषिक देण्यात आले. खोपोली युथ फेस्टिवल 2025 मध्ये परीक्षक हे खोपोली युथ फेस्टिवलचे मागील पर्वाचे विविध क्षेत्रात यश मिळवून अग्रेसर असलेले विजेते तसेच सध्या विविध क्षेत्रात नावाजलेले चेहरे होते.
या कार्यक्रमाला कर्जत विधानसभा प्रमुख पंकज पाटील, खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनिल गोटीराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, युवा सेना शहर प्रमुख संतोष मालकर, उपशहर प्रमुख दिनेश थोरवे, शिवउद्योग सेना जिल्हाप्रमुख हरिष काळे, युवा सेना संपर्क प्रमुख सिद्धांत शेलार, माजी नगरसेवक किशोर पानसरे, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष महाडिक, सामाजिक कार्यकर्ते नदीम खान, अमित फाळे, माजी नगरसेविका वनिता काळे, शहर प्रमुख संदीप पाटील, महिला आघाडी शहर प्रमुख प्रिया जाधव, जेबुन्निसा शेख, हमीद शेख, अनिल मिंडे, सचिन गुरसळ तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी महायुतीचे पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी, उद्योजक, समाजसेवक, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, सहभागी स्पर्धक, विजेते तसेच आयोजक हेल्पिंग हॅन्ड क्लब आणि आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन, महायुतीचे प्रमुख पदाधिकारी तसेच महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांचा आयोजक मुकेश रुपवते यांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली.

