* बारमाही पाताळगंगा नदी उशाला तरी कोरड घशाला
* नगर परिषद पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार
* 68 वर्षीय पत्रकार करणार 26 जानेवारी रोजी उपोषण
खोपोली / प्रतिनिधी :- 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा झाला. पत्रकारांचा उदो उदो करण्यात आला...शासकीय अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी...आमदार - खासदार आदींकडून आम्ही पत्रकारांचे कसे शुभचिंतक आहोत...कसे आमचे पत्रकारांवर प्रेम आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. पण मराठी पत्रकार दिनाचे प्रेम कसे बेगडी होते, याची पोलखोल लगेच झाली आहे. खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी व पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे एका जेष्ठ पत्रकारावर उपोषण करण्याची वेळ आली आहे. खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांच्या दुर्लक्षामुळे 68 वर्षीय पत्रकार 26 जानेवारी 2025 रोजी उपोषण करणार आहेत.
खोपोली नगर परिषद सध्या आपल्या अजबगजब कारभारामुळे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध होत आहे. शहरवासीयांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी प्रसिद्ध असलेली खोपोली नगर परिषद सध्या अस्वच्छ आणि अपुरा पाणीपुरवठा करीत असल्याच्या तक्रारी पाहाव्यास मिळत आहेत. खोपोलीतील लौजी गावातील रहिवासी जेष्ठ पत्रकार जयवंत माडपे यांनी एका भागात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार त्या भागातील पाणीपुरवठा विभाग व अभियंत्यास केली असता त्यावर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. लौजी भागात नवीन कनेक्शन व जुने कनेक्शन असे दोन भाग करण्यात आले असून जुन्या कनेक्शनला दिवसातून दोन वेळा मुबलक पाणी पुरवठा केला जातो, पण नवीन कनेक्शनला फक्त एकच वेळा पाणी पुरवठा केला जात आहे. नगर परिषदेच्या 'त्या' भागातील अभियंताची जुन्या कनेक्शनधारकांवर इतकी मेहरबानी का ? असा प्रश्न उपस्थिती करीत आम्हाला सावत्रपणाची वागणूक का दिली जात आहे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. भेदभाव न करता नवीन कनेक्शन धारकांनाही दोन वेळा पाणी देण्याची व्यवस्था करावी अन्यथा 26 जानेवारी रोजी उपोषण करणार आहोत, याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असे लेखी निवेदन खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील यांना 68 वर्षीय दै. सागरचे जेष्ठ पत्रकार जयवंत माडपे यांनी दिला आहे.
खोपोली नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराने शहरवासी त्रासले आहेत. वासरंग-लौजी रोडवरील रेल्वे गेटसमोरील उघडे चेंबर...राष्ट्रीय महामार्गांवर चेंबर समोर कुजलेल्या अवस्थेतील बॅरिगेट...केएमसी कॉलेजसमोर मुख्य टाकीचे वेस्टेज पाणी महामार्गांवर सोडले जात असून एखादा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास खोपोली नगर परिषद प्रशासन सुधारणा करणार का? याशिवाय दररोज विविध भागांमध्ये हजारों लिटर पाणी वाया जात आहे. खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष आणि पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराने शहरात ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
बारमाही पाताळगंगा नदी खोपोली शहरातूनच नव्हे तर खोपोली नगर परिषदेपासून हाकेच्या अंतरावरून वाहत आहे. शहरवासियांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी प्रसिद्ध असलेली खोपोली नगर परिषद सध्या अस्वच्छ आणि अपुरा पाणीपुरवठा करीत आहे. शिवाय दररोज विविध भागांमध्ये हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभाराने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शहराच्या विविध भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा संदर्भात नगर परिषद प्रशासनाकडे अनेकदा तोंडी तसेच लेखी तक्रारी केल्या आहेत. निवेदने दिली आहेत. आंदोलने केलेली आहेत, तरीही पाणी पुरवठा विभागाच्या कामकाजावर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे.