लिखाण करणाऱ्या पत्रकारांची समाजाला गरज - मा. राज्यमंत्री बदामराव पंडित

 


* पत्रकारांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्राधान्य द्यावे - रणवीर पंडित

* विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन साजरा

गेवराई / प्रतिनिधी :- 6 जानेवारी मराठी पत्रकार दिन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणजेच दर्पण दिन संपूर्ण राज्यभरासह गेवराई तालुक्यामध्ये देखील साजरा करण्यात आला. यामध्ये निर्भीड पत्रकार संघ गेवराई तालुका संघाच्या वतीने दर्पण दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गेवराई शहरातील जि. प. शाळा नं. 2 येथे निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने 6  जानेवारी 2025 रोजी मराठी पत्रकार दिनाचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर अर्थात पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, नायब तहसीलदार संजय सोनवणे, युवा नेते रणवीर पंडित, पोलिस उपनिरीक्षक राम खोत, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती मोरे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. विद्यार्थाना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच सा. गेवराई संघर्ष योद्धा या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पार पडला. 

यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्भीड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अमोल कापसे यांनी केले. गेल्या पाच वर्षापासूनचा निर्भीड पत्रकार संघाच्या कार्याचा लेखा-जोखा त्यांनी मांडला. तर आपले मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री बदामराव पंडित म्हणाले की, आपल्या समाजातील प्रत्येक घटकाच्या अडीअडचणी आणि प्रश्न आहेत. ते सोडून घेण्यासाठी राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे आजही जनहितासाठी लिखाण करणाऱ्या पत्रकारांची समाजाला गरज आहे. त्यामुळे सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांच्या योगदानाची गरज असल्याचेही माजी मंत्री बदामराव पंडित यांनी सांगितले.

शारदा स्पोर्ट अकॅडमीचे संचालक तथा युवा नेते रणवीर अमरसिंह पंडित आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की,  आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांच्यातील शारीरिक कौशल्य पाहता क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना भरपूर संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी मी शारदा स्पोर्ट अकॅडमीच्या माध्यमातून कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या गोष्टींना पत्रकारांनी प्राधान्य द्यावे. तसेच जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांच्या काही समस्या असतील तर त्या मांडण्यासाठी आपल्या पेपरमधील दोन कॉलमची जागा ही शालेय विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी राखीव ठेवावी, असे आवाहन यावेळी युवा नेते रणवीर पंडित यांनी पत्रकारांना केले. नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी आपल्या मनोगतात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली तर पत्रकार हा समाजाचा दर्पण म्हणजेच आरसा आहे. त्यांनी पारदर्शकपणेच काम करावे असा सल्ला त्यांनी यावेळी पत्रकारांना दिला. यावेळी परमेश्वर महाराज वाघमोडे, पोलिस उपनिरीक्षक राम खोत, माजी सैनिक अरुण परदेसी, तलाठी अशोक काटे यांनी देखील आपले विचार मांडले तर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. 

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक लोक मंथनचे तालुका प्रतिनिधी उद्धव काळे यांनी केले तर निर्भीड पत्रकार संघाचे औदुंबर खेडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निर्भीड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अमोल कापसे, तालुका उपाध्यक्ष सलमान शेख, तालुका सचिव बाळासाहेब घाडगे, शहराध्यक्ष सतीश वाघमारे, असलम कादरी, सय्यद गफ्फार, भाऊसाहेब नाटकर, गजानन संभाहारे, अशोक मोरे, समीर सौदागर, भाऊसाहेब महानोर, प्रदीप गाजरे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळा नंबर 2 च्या मुख्याध्यापिका स्वाती मोरे, शिक्षक जितेंद्र दहिफळे,  शिक्षक देशमाने, कालिदास बहिर, रतन ननवरे, शारदा देवकर, ताराबाई वाटोरे, बेबीनंदा देवढे, वर्षा काळे, स्वाती यांनी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post