* कर्जत शिवालय येथे कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात
कर्जत / मानसी कांबळे :- विधानसभा निवडणुकीत कर्जत-खालापूर मतदार संघात पराभव मिळाल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले असल्याचे दिसून येत आहे. आगामी महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी नव्याने कामाला लागावे...त्यांच्यात उत्साह संचारला जावा, यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी ऊर्जेची मशाल पेटवली.
महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत शिवालय येथे नुकताच कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, रायगड जिल्हा संघटीका सुवर्णा जोशी, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, खालापूर संपर्क प्रमुख उमेश गावंड यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वर्ग तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्जत-खालापुर विधानसभा निवडणुकीमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. परंतु यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा प्रेरित केली. विरोधकांवर टिका करत ते म्हणाले की, शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. गद्दारांनी हिंदुत्वाचा बाजार मांडला आहे. जे गेले त्यांना जाऊ दे पण जे कार्यकर्ते आपले निष्ठावान कार्यकर्ते आपल्यासोबत काम करीत आहेत. त्यांच्यासह पराभवाला खचून न जाता पुन्हा जोमाने कामाने लागा. पाच महिन्यांमध्ये नगर परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नक्कीच चित्र बदलू शकेल आपल्याला मतदार यादी डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल असली पाहिजे. यासाठी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा हेतू ठेवून कार्यरत रहा, असे सांगत उपस्थित पदाधिकारी, महिला, युवा कार्यकर्ते यांच्यामध्ये आपल्याला संवादाने नवचैतन्य निर्माण केले. यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, जिल्हा संघटीका सुवर्णा जोशी, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे आदी उपस्थित होते.