रायगड / प्रतिनिधी :- सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभाग अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक रायगड अलिबाग आणि एच. एल. एल. लाईफ केअर लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रूग्णालय म्हसळा येथे सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेंटरचे लोकार्पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याची घोषणा ना. तटकरे यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉं. प्रफुल्ल पावसेकर, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉं. किरण शिंदे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, स. पो. निरिक्षक संदीप कहाळे, सा. बांधकाम अभियंता महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना. तटकरे म्हणाल्या की, म्हसळा या ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र कक्षात ५ डायलिसिस मशीन व बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दर दिवसाला १५ डायलिसिस रूग्णांना सेवा दिली जाणार आहे. डायलिसीस सुविधा देणारे हे रायगड जिल्हयातील सर्वात मोठे केंद्र आहे. अशा प्रकारे जिल्हयात ३२ केंद्र मंजुर करण्यात आले आहेत. संपुर्ण राज्यात शासनाने ४०० डायलिसिस केंद्रांना मंजुरी दिली असून त्यामधे रोज ३००० रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. श्रीवर्धन मतदार संघात श्रीवर्धन येथे २, माणगाव २ आणि रोहा येथे ३ मशीन उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन ना. तटकरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉं. प्रफुल्ल पावसेकर यांनी केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.