* खोटेपणाचा गाठला कळस
* पंतप्रधान मातृ वंदन योजना
कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत तालुका आरोग्य खात्याने जानेवारी 2017 ते डिसेंबर 2023 पर्यंत आशा सेविकांनी आरोग्य खात्याकडे दिलेल्या प्रत्येक वर्षाची गावनिहाय फॉर्मची संख्या 25 जानेवारी 2025 रोजी दिली आहे. परंतु याच कर्जत आरोग्य खात्याने या आधीसुद्धा 2017 ते डिसेंबर 2023 पर्यंत आशा सेविकांनी आरोग्य खात्याकडे दिलेल्या प्रत्येक वर्षाची गावनिहाय फॉर्मची संख्या दिली होती.
दोन्ही माहिती बघितली तेव्हा कर्जत आरोग्य खात्याकडून जनतेची कशी फसवणूक चालवली आहे हे लक्षात येते. त्यांनी आधी दिलेली माहिती आणि आता दिलेली माहिती यात खूपच फरक आहे. म्हणजे त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दरवर्षी आशानी गावनिहाय दिलेली संख्या बदलते आहे. बहुतेक ते विसरून गेले आहेत की त्यांनी यापूर्वीही माहिती दिलेली असून त्यामध्ये आकडेवारी वेगळी आहे. आणि अजूनपर्यंत कर्जत शहरी भागातल्या व माथेरानमधल्या वंचित महिला लाभार्त्यांची कोणतीच माहिती कर्जत आरोग्य विभागाने जाहीर केलेली नाही.
आता, महिलांचे फॉर्म ऑनलाईन केले नाही आणि महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवून व खोटी फिरती बिल दाखवून शसकीय पैशाचा अपहार केला म्हणून कंत्राटी ऑपरेटर प्रवीण भोईर, लेखापाल अनिता पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबरोबरच आता शासकीय खोटी माहिती तयार करून दिली म्हणून संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आंदोलक राजेंद्र शिवाजी जाधव व तक्रारदार सुचित्रा लोकरे यांनी सांगितले.
अशा कामचुकार व फ्रॉड कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे व चुकीच्या माहितीवर सही करून खोटी माहिती देऊन जनतेची फसवणूक करणारे व लाभार्थी महिलांना लाभापासून वंचित ठेवणारे डॉं. नितीन गुरव यांच्यावर सुद्धा प्रशासकीय कारवाई होणे गरजेचे आहे.
वंचित महिलांना लाभ मिळून देण्यापेक्षा दोषी कर्मचाऱ्यांना वाचविण्यात अधिकाऱ्यांना जास्त इंटरेस्ट आहे हे आता स्पष्ट झाले आहे. उपोषणाचे पत्र देऊन एक महिना झाला तरी त्यांनी एकही दोषी कर्मचाऱ्यांना नोटीस दिली नाही आणि वरिष्ठ कार्यालयाला काहीच कळविले नाही. माहितीच्या अधिकारात दिलेल्या आशांच्या रजिस्टरप्रमाणे किती महिला लाभापासून वंचित आहेत ही माहिती काढण्यापेक्षा उलट खोटी माहिती देऊन जनतेची दिशाभूल करीत आहेत.
आता प्रवीण भोईर, अनिता पवार, शितल शिंदे या कंत्राटी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना मदत करणाऱ्या डॉं. नितीन गुरव यांच्याविरुद्ध वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार की नाही हे बघणे आता गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलक राजेंद्र शिवाजी जाधव व तक्रारदार सुचित्रा लोकरे यांनी दिली.
