कर्जत / प्रतिनिधी :- अभिनव ज्ञान मंदिर प्रश्नाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे यावर्षी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त संविधान प्रतिकृती दालन उभारण्यात आले. या दालनाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते विजय हरिश्चंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह वेगवेगळ्या विषयांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलनादरम्यान आयोजित क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान दालन, ग्रंथ दालन, विज्ञान दालन, चित्रकला दालन आणि रांगोळी दालन यांचे उद्घाटन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक करण्यात आले.
या समारंभात विजय दामू मोरे सर यांना "अभिनव आदर्श शिक्षक" पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेच्या मुख्याध्यापकांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या पुरस्कारासाठी मोरे सर यांची निवड करण्यात आली. त्यांनी सामाजिक कार्यात घेतलेला सक्रिय सहभाग, नाट्य महोत्सवात सचिव व अध्यक्ष म्हणून केलेले काम, तसेच शालेय कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेचे नेतृत्व करताना केलेले उपक्रम यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. मोरे सर यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे यशस्वी आयोजन करून संस्थेला आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या समर्पित कार्यामुळे त्यांना "अभिनव आदर्श शिक्षक" पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे खजिनदार पद्माकर गांगल, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सामाजिक कार्यकर्ते विजय हरिश्चंद्रे, संस्था सहखजिनदार श्रीकांत ओक, शालेय समिती अध्यक्ष विनायक चितळे, संस्था सदस्य रविंद्र खराडे, संस्था सदस्य चंद्रकांत कुडे सर, शालेय समिती सदस्य आशुतोष कुलकर्णी, मुख्याध्यापक डी. एस. शिंदे सर, स्नेहसंमेलन अध्यक्षा संगिता भोईर, दाभाडे मॅडम, विजय मोरे सर तसेच प्रमुख उपस्थित यशस्वी माजी विद्यार्थी प्रतिनिधी कैलास म्हामले, सागर भुईकोट, अजय शिर्के, देवेश निमकर, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष अंकुश घोडविंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या समारंभात दरवर्षीप्रमाणे यावेळीही यशस्वी माजी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. माजी विद्यार्थी कैलास म्हामले यांनी आपल्या भाषणातून संस्थेबद्दल ऋण व्यक्त केले आणि त्यांच्या यशामध्ये संस्थेच्या योगदानाला मान्यता दिली.
